बातम्या

*माळरानावरील भातशेतीला फटका तर पाण्याची उपलब्धता असलेली भात शेती तग धरून

Rice cultivation on upland barren terrain suffers


By nisha patil - 10/26/2026 1:46:21 PM
Share This News:



*माळरानावरील भातशेतीला फटका तर पाण्याची उपलब्धता असलेली भात शेती तग धरून

*आजरा(हसन तकीलदार):-आजरा तालुका हा भातशेतीसाठी ओळखला जातो. विशेषतः आजरा घनसाळ तांदळासाठी तर आजरा तालुक्याचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. सद्यस्थितीत आजऱ्यातील भात शेतीची परिस्थिती एका बाजुला संधी देणारी तर दुसऱ्या बाजूला हवामान बदल, अवर्षण आणि वाढत्या खर्चामुळे आव्हानात्मक बनली आहे. सद्या पावसाने दडी मारल्याने माळ रानावरील भात शेती करपून गेली आहे तर ज्या ठिकाणी पाण्याची साधने व स्तोत्र उपलब्ध आहेत त्या ठिकाणी भातपीक चांगले आहे.
     

यावर्षी पावसाचा लहरीपणा वाढला आहे. मान्सूनच्या काळात पावसाचा खंड पडल्यामुळे आणि आता सुगीच्या दिवसात अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मजुरांचे संकट, निसर्गाचा लहरीपणा, खते औषधाचे वाढते दर आणि वन्यप्राण्यांचा त्रास यामुळे शेती करणे तारेवरची कसरत बनली आहे. या सर्वांवर मात करून आधुनिकतेकडे वाटचाल करून शेती करणे काळाची गरज बनली आहे. मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी यंत्राद्वारे भात रोपण करणेसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व आधुनिक यंत्रसामुग्री पुरवणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग चर्चासत्र, मार्गदर्शन, माहिती व यंत्र पुरवठा करण्याचे काम करीत आहे.

शेतकऱ्यांनी याचा लाभ घेणे गरजेचे आहे. चारसूत्री भात लागवड आणि योग्य खतव्यावस्थापन याचीही माहिती कृषी विभाग देत आहे. आजऱ्यातील भात शेतीला योग्य बाजारभाव आणि जी आय टॅगमुळे सुवर्णकाळ येण्याची संधी आहे. मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि मजुरांच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणचा आधार घेणे क्रमप्राप्त ठरत आहे. आजऱ्यात काही भाग डोंगराळ असल्याने सर्वच ठिकाणी कृत्रिम सिंचनाची सोय उपलब्ध नाही. जे शेतकरी पाणी उपसा करून पीक वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा डिझेल व विजेचा खर्च वाढल्यामुळे शेतीचा एकूण उत्पादन खर्च वाढतो परिणामी तांदळाचा दरही वाढतो त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याची झळ पोहचते. जादा दराने तांदूळ खरेदी करावे लागत आहेत.


*माळरानावरील भातशेतीला फटका तर पाण्याची उपलब्धता असलेली भात शेती तग धरून
Total Views: 241