बातम्या
आजऱ्याच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम युद्धपातळीवर
By Administrator - 3/24/2026 5:56:48 PM
Share This News:
आजऱ्याच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम युद्धपातळीवर
आजरा(हसन तकीलदार):- : शहरातील मुख्यबाजारपेठेतील रस्त्याच्या कामाला आज पासून सुरवात झाली आहे. पहिल्या टप्यात महागाव कार्नर (मेघना कोल्ड्रिंक्स )ते नगरपंचायत कार्यालयापर्यंत रस्त्याचे काम केले जाणार आहे. २४० मीटरचे हे डांबरीकरण आहे. दोन ते अडीच दिवसात रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. मुख्यबाजारपेठ असल्याने युध्दपातळीवर काम सुरु असून पोलीस बंदोबस्तात गटारीवरील अतिक्रमणे काढण्यात आली. काम सुरु असल्याने या मार्गावरील वहातूक दर्गा गल्ली,लिंगायत गल्ली ते महागाव मार्गकडे वळवण्यात आलेली आहे.
शहरातील मुख्यबाजारपेठतील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. काही ठिकाणी रस्ता निखळून खडी बाहेर पडली होती. नवीन पाईप लाईन खुदाईमुळे धुळीचे साम्राज्य पसरले होते. व्यापारी आणि ग्राहकांना धुळीचा त्रास होत होता तर वाहनधारक व पादचाऱ्यांना ये- जा करतांना अडचणीचे होत होते त्याचबरोबर या रस्त्यावर गटारीच्यापुढे दुकानदारांनी जाहीरात फलक, पत्रे वाढवून अतिक्रमण केले होते. वहातुकीला याचा अडथळा येत होता. नगरपंचायतीने आज मंगळवारी सकाळीच अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. ज्या दुकानदारांनी गटारीवर अतिक्रमण केले होते.
ती काढून टाकली. मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्या सुचनेनुसार बांधकाम विभागाचे अभियंता प्रविण बैले, स्वच्छता निरीक्षक अमर कांबळे व इतर कर्मचारी रस्त्यावरील दुकानदारांची अतिक्रमणे काढण्यासाठी सहभागी झाले होते. दरम्यान रस्त्यावर खडी पसरणे, डांबर टाकणे व रोलींगची कामे वेगाने सुरु झालेली आहेत. दोन दिवसात हा रस्ता पूर्ण केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात महागाव कार्नर(मेघना कोल्ड्रिंक्स) ते छत्रपती संभाजी चौक महामार्ग पर्यंत दिवसभर रहदारी असते.
वहातुकीस अडथळा येवू नये म्हणून येथील काम रात्रीच्या वेळी केले जाणार आहे असे ठेकेदार विलास भादवणकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.एकंदरीत ठेकेदार विलास भादवणकर यांनी नियोजनबद्ध आणि वेळेत काम पूर्ण करण्याची तयारी केली असल्याचे दिसून येत आहे.
आजऱ्याच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम युद्धपातळीवर
|