बातम्या

केखले गावातील रस्ते दुरवस्थेत; ग्रामपंचायतीकडे दुरुस्तीची मागणी

Roads in Kekhale village are in poor condition


By nisha patil - 8/18/2025 4:26:49 PM
Share This News:



केखले गावातील रस्ते दुरवस्थेत; ग्रामपंचायतीकडे दुरुस्तीची मागणी

पन्हाळा तालुका | प्रतिनिधी पन्हाळा तालुक्यातील केखले गावातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदनाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गावातील सर्व गल्ली रस्ते मागील तीन वर्षांपासून उकरून ठेवले आहेत. पूर्वी हे रस्ते चांगल्या प्रतीचे डांबरी होते. मात्र, ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत रस्ते उकरल्यानंतर आजतागायत योग्य स्वरूपात पुनर्बांधणी करण्यात आलेली नाही.

ग्रामपंचायतीतर्फे सध्या रस्त्यांवर मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यांची उंची वाढून अनेक गरीब कुटुंबांच्या घरांच्या तुलनेत रस्ते उंच होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी व चिखल घरामध्ये शिरण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायतीने मुरूम टाकण्याऐवजी मेन रोड १ ते २ फुटाने उकरून वरचा चिखल काढून रोलिंग करून दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या रस्त्यांचे काँक्रीट किंवा डांबरीकरण करून कायमस्वरूपी सोडवणूक करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन राजाराम नरके, अध्यक्ष पन्हाळा तालुका सहकार सेल यांनी ग्रामपंचायतीला दिले असून, गावातील सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 


केखले गावातील रस्ते दुरवस्थेत; ग्रामपंचायतीकडे दुरुस्तीची मागणी
Total Views: 148