बातम्या
गोकुळच्या सत्तासंघर्षात रोहित पवारांची एन्ट्री! ९ नोव्हेंबरला कोल्हापुरात उतरणार मैदानात!
By Administrator - 6/11/2026 4:55:00 PM
Share This News:
गोकुळच्या सत्तासंघर्षात रोहित पवारांची एन्ट्री! ९ नोव्हेंबरला कोल्हापुरात उतरणार मैदानात!
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचा सत्तासंघर्ष आता आणखी पेटणार आहे. सरकारने गोकुळवर पाच शासननियुक्त तज्ज्ञ संचालक नेमण्याच्या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पाच स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्याने गोकुळमधील सत्तेचं गणित बदलण्याची शक्यता आहे.
सध्या गोकुळमध्ये सतेज पाटील गटाचे १३, तर महायुतीचे १२ संचालक आहेत. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे बहुमताचं पारडं महायुतीच्या बाजूने झुकू शकतं. याच निर्णयाविरोधात येत्या ९ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारही सहभागी होणार आहेत. सरकारचा रडीचा डाव उधळून लावण्यासाठी मीही कोल्हापूरला येतोय, अशी पोस्ट करत त्यांनी कोल्हापूरकरांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, आ. सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर या निर्णयामागे षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ९ नोव्हेंबरचा मोर्चा गोकुळच्या सत्तासंघर्षाला कोणतं वळण देणार, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
गोकुळच्या सत्तासंघर्षात रोहित पवारांची एन्ट्री! ९ नोव्हेंबरला कोल्हापुरात उतरणार मैदानात!
|