बातम्या
सी पी आर विभागप्रमुख डॉ. परितेकर यांच्या घरी ५५ लाखांची चोरी
By nisha patil - 8/13/2025 3:04:55 PM
Share This News:
सी पी आर विभागप्रमुख डॉ. परितेकर यांच्या घरी ५५ लाखांची चोरी
मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले ५० तोळे दागिने व रोकड लंपास
सीपीआर हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागप्रमुख डॉ. अनिता अरुण परितेकर (वय ५७, रा. अनंत प्राइड, न्यू शाहुपुरी) यांच्या घरी भरदुपारी धाडसी घरफोडी झाली. मुलाच्या लग्नासाठी जपून ठेवलेले तब्बल ५० तोळे सोन्या-हिऱ्याचे दागिने आणि २५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या चोरीची एकूण किंमत सुमारे ५५ लाख रुपये असून, गजबजलेल्या भागात घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ११) सकाळी परितेकर दाम्पत्य कामानिमित्त बाहेर पडले होते. मुलगा क्लाससाठी गेला असताना, दुपारी अडीच वाजता स्वयंपाकीण घरी आली तेव्हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी बेडरूममधील लाकडी कपाट फोडून तीन मंगळसूत्रे, कर्णफुले, सोनसाखळी, अंगठ्या, तोडे, ब्रेसलेट, हिऱ्याचे टॉप्स आणि रोकड असा ऐवज चोरून नेला.
माहिती मिळताच शाहुपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप यश मिळालेले नाही. पोलिसांनी परितेकर यांची फिर्याद नोंदवून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
सी पी आर विभागप्रमुख डॉ. परितेकर यांच्या घरी ५५ लाखांची चोरी
|