बातम्या

‘नशा मुक्त कोल्हापूरसाठी - रन अँड वॉक’ टी-शर्टचे अनावरण

Run and Walk for a Drug Free Kolhapur


By nisha patil - 9/26/2025 4:10:24 PM
Share This News:



‘नशा मुक्त कोल्हापूरसाठी - रन अँड वॉक’ टी-शर्टचे अनावरण

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन 

दि.२८ सप्टेंबर रोजी कोल्हापूरकर देणार नशामुक्त कोल्हापूरसाठी संदेश 

कोल्हापूर, दि. २६ : जिल्ह्यातील नागरिकांना नशामुक्तीबाबत जागरुक करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त कोल्हापूर अभियान अंतर्गत, शाही दसरा महोत्सव कालावधीमध्ये ‘रन अँड वॉक’ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत ‘नशामुक्त कोल्हापूरसाठी रन अँड वॉक’ टी-शर्ट चे अनावरण करण्यात आले. 

संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळी नशामुक्त कोल्हापूरसाठी रन अँड वॉक मधून सहभागी होत हजारो नागरिक नशाविरोधी संदेश देणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी महसूल संपत खिलारी यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व जिल्हावासियांनी नशामुक्त कोल्हापूरसाठी आयोजित करण्यात आलेल्या रन अँड वॉक या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले. 


कोल्हापूर शहरात दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता पोलीस परेड ग्राऊंड, कसबा बावडा येथे रनला सुरुवात होणार आहे. याबाबत कोल्हापूर शहरासाठी जिल्हा प्रशासनाकडून निःशुल्क नोंदणीसाठी लिंक तयार करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे मुख्यालय स्तरावर कोल्हापूर येथे नशा मुक्त कोल्हापूर साठी रन अँड वॉकचे आयोजन करण्यात आले आहे, त्याच पद्धतीने जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये, तालुकास्तरावर तसेच सर्व नगरपरिषद स्तरावरसुद्धा रन अँड वॉक चे आयोजन करण्यात आले आहे. त्या त्या ठिकाणी जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्यासाठी तेथील स्थानिक नोंदणी लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.


‘नशा मुक्त कोल्हापूरसाठी - रन अँड वॉक’ टी-शर्टचे अनावरण
Total Views: 77