ताज्या बातम्या
अंबप गावचा लौकीक राज्यातच नाही तर देश पातळीवर पोहोचला आहे : एस. कार्तिकेयन
By nisha patil - 9/18/2025 12:21:29 PM
Share This News:
अंबप : (हातकणंगले किशोर जासुद)
हातकणंगले तालुक्यातील अंबप गावाने विधवांच्या अनिष्ट प्रथांना तिलांजली देत समाजात मानसन्मान मिळवून दिल्याबद्दल गावचा नावलौकिक राज्यातच नाही तर देशपातळीवर पोचला आहे. याची दखल देशातील प्रसिद्ध मॅक्झिनने घेतली आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले. ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये बोलत होते.
बुधवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामसभा ग्रामपंचायतच्या समोरील पटांगणात पार पडली. यावेळी अंबप गर्ल्स हायस्कूल व अंबप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.
सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना उपसरपंच असिफ मुल्ला म्हणाले की, अंबप गावच्या ग्रामस्थांनी बदलाची वाट न बघता बदल घडवण्यासाठी एकत्र यावे. तर ग्रामसभेच्या माध्यमातून लोकशाही मजबूत होते असे मत माजी सरपंच संपत कांबळे यांनी प्रास्ताविकेत मांडले . माजी उपसरपंच सह्याद्री शिक्षण समूहाचे प्रमुख संस्थापक राजेंद्र माने यांनी आभार मानले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी, विस्तार अधिकारी ए. एस. कटारे, विमानतळ प्राधिकरण समिती सदस्य विकासराव माने, ग्रामपंचायत अधिकारी एस जे कांबळे , माजी सरपंच संपत कांबळे, उपसरपंच असिफ मुल्ला, पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष उंडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंबप गावचा लौकीक राज्यातच नाही तर देश पातळीवर पोहोचला आहे : एस. कार्तिकेयन
|