बातम्या
एस.आय.आर वोटिंग मॅपिंगचे काम अपूर्ण; मुदतवाढीसाठी मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By nisha patil - 7/5/2026 6:14:30 PM
Share This News:
एस.आय.आर वोटिंग मॅपिंगचे काम अपूर्ण; मुदतवाढीसाठी मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर शहरातील एस.आय.आर वोटिंग मॅपिंगचे काम अद्याप मोठ्या प्रमाणात अपूर्ण असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सदर काम पूर्ण करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.
मनसेच्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर शहरातील मोठ्या लोकसंख्येमुळे मतदारसंघ विस्तृत असून बी.एल.ओ. कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या १० मे २०२६ या मुदतीत एस.आय.आर प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. सध्या केवळ ५० ते ६० टक्के मॅपिंगचे काम पूर्ण झाले असून उर्वरित ४० टक्के कामासाठी फक्त चार दिवसांचा कालावधी उरला आहे.
जर हे मॅपिंग वेळेत पूर्ण झाले नाही तर अनेक मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात, हा लोकशाहीसाठी गंभीर प्रश्न असल्याचे मनसेने नमूद केले. तसेच काही ठिकाणी एकाच घरात दोन बी.एल.ओ. सर्वेसाठी जात असल्याने कामात अनियमितता होत असल्याचा आरोपही करण्यात आला.
बी.एल.ओंना अद्ययावत मतदार यादी उपलब्ध करून द्यावी, स्थलांतरित मतदारांबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात तसेच आठवड्यातील अधिक दिवस एस.आय.आर प्रक्रियेसाठी कार्यरत ठेवावे, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या.
दरम्यान, शासनाच्या चुकीमुळे एकही मतदार मतदानापासून वंचित राहिल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मनसेने दिला आहे.
जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात तालुका अध्यक्ष अभिजीत पाटील, जिल्हा सचिव निलेश आजगावकर, अरविंद कांबळे, यतीन होरणे, विजय करजगार, राजन हुल्लोळी, उत्तम वंदुरे, सुनिल तुपे, राहुल पाटील, गणेश शिंदे, रोहित कांबळे, गणेश सांगवडेकर, दिलीप पाटील, बाजीराव दिंडोर्ले, अजिंक्य शिंदे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
एस.आय.आर वोटिंग मॅपिंगचे काम अपूर्ण; मुदतवाढीसाठी मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
|