बातम्या
एसबीआय ग्राहकांनो सावधान! मोबाइल नंबरपासून घराच्या पत्त्यापर्यंतचा डेटा लीक?
By nisha patil - 10/22/2026 11:21:16 PM
Share This News:
एसबीआय ग्राहकांनो सावधान! मोबाइल नंबरपासून घराच्या पत्त्यापर्यंतचा डेटा लीक?
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांच्या डेटाबाबत एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याच्या वृत्तामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पण नेमका कोणता डेटा लीक झाला? तुमच्या खात्यातील पैसे सुरक्षित आहेत का? जाणून घ्या महत्त्वाची माहिती!
प्राथमिक तपासात काही नोंदींमधून ग्राहकांची नावं, जन्मतारीख, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, घराचा पत्ता आणि बँकिंगशी संबंधित ओळख तपशील उघड झाल्याचं समोर आलं आहे. डार्क वेबवर सुमारे ३ लाख ७५ हजार नोंदी आढळल्याचं वृत्त आहे. मात्र, त्यातील ३ हजार ८९७ नोंदींमध्ये वैयक्तिक ओळख माहिती उघड झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती आहे.
मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या! डेटा लीक झाला म्हणजे तुमच्या बँक खात्यातील पैसे चोरीला गेलेच, असा अर्थ होत नाही. पासवर्ड, एटीएम पिन किंवा खात्यातून पैसे काढल्याच्या प्रकाराला अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
मात्र, तुमची वैयक्तिक माहिती फसवणूक करणाऱ्यांच्या हाती लागल्यास बनावट बँक कॉल, फसवे मेसेज आणि ओटीपी मागून आर्थिक फसवणूक होण्याचा धोका वाढू शकतो.
मग एसबीआय ग्राहकांनी काय करावं? खात्यातील व्यवहार नियमित तपासा. कोणालाही ओटीपी, एटीएम पिन किंवा पासवर्ड सांगू नका. संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका आणि बँकेच्या नावाने आलेल्या कॉलवर आंधळा विश्वास ठेवू नका.
एसबीआयने या प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र सायबर सुरक्षा संस्थेची मदत घेतल्याचं सांगितलं आहे.
एसबीआय ग्राहकांनो सावधान! मोबाइल नंबरपासून घराच्या पत्त्यापर्यंतचा डेटा लीक?
|