बातम्या

स्मॅक आयटीआय विद्यार्थ्यांची शिरोली औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता मोहीम

SMACK ITI students conduct cleanliness drive in Shiroli


By nisha patil - 12/23/2025 4:24:01 PM
Share This News:



स्मॅक आयटीआय विद्यार्थ्यांची शिरोली औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता मोहीम

 प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी स्वच्छता मोहीम नियमितपणे राबविण्यात येणार

शिरोली एमआयडीसी : शिरोली औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता व सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यासाठी स्मॅक आयटीआयच्या वतीने ‘स्वच्छ परिसर’ ही विशेष संकल्पना राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत शिरोली एमआयडीसीतील पहिला फाटा ते श्रीराम फाउंड्री युनिट नं. १ या परिसरात व्यापक स्वच्छता करण्यात आली.

उद्योग परिसर स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. पुढील काळात प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी ही स्वच्छता मोहीम नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

स्मॅक आयटीआय ही सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे कुशल तांत्रिक शिक्षण देणारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून, विद्यार्थ्यांना सक्षम कर्मचारी तसेच भविष्यातील उद्योजक बनवण्याचा मार्ग दाखवते. येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे होतकरू, सकारात्मक दृष्टिकोन असलेले व प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेणारे असल्याचे नमूद करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी औद्योगिक वसाहतीत स्वच्छता केल्याने एमआयडीसी ही आपलीच असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होईल. यातून त्यांच्या कामातील शिस्त, जबाबदारी व कुशलता अधिक ठळकपणे दिसून येईल, असे प्रतिपादन स्मॅक आयटीआयचे चेअरमन प्रशांत शेळके यांनी केले.

सध्या सुरू असलेल्या बॅचमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी जून-जुलै महिन्यात प्रशिक्षण पूर्ण करणार असून, त्यानंतर त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिरोली एमआयडीसीतील उद्योगांमध्ये अप्रेंटिसशिप तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे उद्योजकांना कुशल मनुष्यबळ मिळेल आणि पुढे हेच विद्यार्थी अनुभवाच्या जोरावर उद्योजक म्हणूनही पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्योग क्षेत्राची प्रत्यक्ष ओळख, स्वच्छतेचे महत्त्व तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

हा उपक्रम स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगुले, उपाध्यक्ष भरत जाधव व आयटीआयचे चेअरमन प्रशांत शेळके यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. 

या उपक्रमास आयटीआयचे चेअरमन प्रशांत शेळके, ट्रेनिंग कमिटी सदस्य भीमराव खाडे, जयदत्त जोशीलकर, प्राचार्य ए. एस. हसुरे, सर्व प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


स्मॅक आयटीआय विद्यार्थ्यांची शिरोली औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता मोहीम
Total Views: 60