बातम्या
सातवेत ६०० विद्यार्थ्यांना सुरक्षा विमाकवच
By nisha patil - 10/17/2025 3:36:50 PM
Share This News:
सातवेत ६०० विद्यार्थ्यांना सुरक्षा विमाकवच
सोहन दळवी सरकार यांचा स्तुत्य उपक्रम — वारणा समूहाच्या माय माऊली शोभाताई कोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम
वारणानगर (प्रतिनिधी : सुनील पाटील) : सातवे (ता. पन्हाळा) येथे वारणा समूहाच्या माय माऊली स्वर्गीय शोभाताई कोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक अनोखा आणि संवेदनशील उपक्रम राबवण्यात आला. गावातील एकूण ६०० विद्यार्थ्यांना सुरक्षा विमाकवच प्रदान करण्यात आले. हा उपक्रम युवा नेते सोहन दळवी सरकार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात वारणा सहकारी बँकेचे व्यस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विश्वेश कोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सुरक्षा विमाकवच देण्यात आले.
सातवे, शिंदेवाडी आणि वाळकेवाडी येथील शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या विम्याचा लाभ मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी सातवे केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळून दुर्घटना घडली होती; सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हाच प्रसंग लक्षात घेऊन भविष्यातील विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने सोहन दळवी सरकार यांनी हा उपक्रम हाती घेतला.
तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरील ज्ञान वाढावे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चांगले संस्कार रुजावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या बालभारती संस्थेचा दिवाळी विशेष किशोर अंक ५०० विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला.
विश्वेश कोरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत “आईसाहेबांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राबवलेला हा स्तुत्य उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे,” असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार राजेंद्र जाधव यांनी मानले.
यावेळी माजी सरपंच संजय दळवी सरकार, राजाराम पवार, जयसिंग पाटील, दादासो जाधव, कुमार कणसे, महेश जाधव, अरुण वाळके, सतीश पवार, सयाप्पा गोरड, अमर निकम, संदीप माळी, जितेंद्र चव्हाण, सागर पाटील (पापा), राजकुमार इंगवले, नामदेव कांबळे, अविनाश निकम, शिवाजी गोरड आदी मान्यवर उपस्थित होते.
सातवेत ६०० विद्यार्थ्यांना सुरक्षा विमाकवच
|