बातम्या
गावात ‘साहेब’ मिळणार! ग्रामसेवक-तलाठ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीची तयारी
By nisha patil - 9/21/2026 4:43:01 PM
Share This News:
गावात ‘साहेब’ मिळणार! ग्रामसेवक-तलाठ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीची तयारी
गावाचा आयुक्त म्हणजे ग्रामसेवक आणि गावचा जिल्हाधिकारी म्हणजे तलाठी... पण हेच ‘साहेब’ कामाच्या वेळी कार्यालयात सापडत नसल्याच्या तक्रारी आता कमी होण्याची शक्यता आहे. ग्रामसेवक आणि तलाठ्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही पदांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याच्या हालचाली ग्रामविकास विभागात सुरू आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांची अनेक कामं ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयाशी संबंधित असतात. दाखले, शासकीय योजना, फेरफार, पंचनामे आणि महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना वारंवार या अधिकाऱ्यांची गरज भासते. मात्र, अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्यास ‘साहेब मीटिंगला गेलेत’, ‘तालुक्याला गेलेत’, ‘फिरतीवर आहेत’ अशी उत्तरं नागरिकांना ऐकावी लागतात. त्यामुळे छोट्या कामांसाठीही तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात.
यावर उपाय म्हणून ग्रामसेवक आणि तलाठ्यांची बायोमेट्रिक हजेरी सुरू झाल्यास त्यांच्या उपस्थितीवर नियमित नियंत्रण ठेवता येणार आहे. त्यामुळे गावातील कामं गावातच मार्गी लागण्यास मदत होईल, तसेच तहसीलदार, पंचायत समिती आणि जिल्हास्तरीय कार्यालयांवरील अनावश्यक ताणही कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या बायोमेट्रिक हजेरीबाबत अंतिम निर्णय आणि अंमलबजावणी कधीपासून होणार, याकडे आता ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे.
गावात ‘साहेब’ मिळणार! ग्रामसेवक-तलाठ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीची तयारी
|