बातम्या
कागलमध्ये पिलर उड्डाणपुलास मंजुरी; समरजितसिंह घाटगे यांचे गडकरींना आभार
By nisha patil - 7/23/2025 3:34:36 PM
Share This News:
कागलमध्ये पिलर उड्डाणपुलास मंजुरी; समरजितसिंह घाटगे यांचे गडकरींना आभार
विस्थापितांच्या मागण्यांबाबतही सकारात्मक चर्चा
कागल | प्रतिनिधी : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कागलमध्ये पिलरच्या स्वरूपातील उड्डाणपुलास मंजुरी दिल्याबद्दल शाहू ग्रुपचे अध्यक्ष व माजी खासदार राजे समरजितसिंह घाटगे यांनी नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेऊन मनःपूर्वक आभार मानले.
या निर्णयामुळे कागल शहरात वाहतूक सुरळीत होणार असून, प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे. घाटगे यांनी यापूर्वी गडकरी यांची भेट घेऊन, कराडच्या धर्तीवर भराव न करता पिलरच्या माध्यमातून उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली होती. यानुसार सेवानिवृत्त अधिकारी आर.के. पांडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कागलमध्ये पाहणी करून नागरिकांच्या सूचना ऐकल्या. या समितीच्या शिफारशीनुसार पूर्वीचे भराव टाकून करण्यात येणारे टेंडर रद्द करून नवीन पिलर फ्लायओव्हरचे टेंडर प्रस्तावात समाविष्ट करण्यात आले आहे.
या बैठकीत समरजितसिंह घाटगे व नितीन गडकरी यांच्यात इतर विकासकामांबाबतही सविस्तर चर्चा झाली.
विस्थापितांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा
उड्डाणपुलामुळे विस्थापित होणाऱ्या नागरिकांच्या नुकसानभरपाई आणि इतर मागण्यांबाबतही राजे घाटगे यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे ठामपणे भूमिका मांडली. नुकसानभरपाई बाजारभावानुसार वाढीव दराने मिळावी, रस्त्याच्या रुंदीकरणात दोन मीटर सवलत द्यावी यासह इतर मागण्या त्यांनी सविस्तरपणे मांडल्या. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, “या मागण्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ,” असे आश्वासन गडकरी यांनी दिले, अशी माहिती घाटगे यांनी दिली.
कागलमध्ये पिलर उड्डाणपुलास मंजुरी; समरजितसिंह घाटगे यांचे गडकरींना आभार
|