राजकीय
समीर गायकवाड यांचे निधन म्हणजे व्यवस्थेने घेतलेला बळी – सनातन संस्था
By nisha patil - 1/20/2026 4:17:52 PM
Share This News:
सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांचे आज दुर्दैवी निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, अशी प्रार्थना करत समीर गायकवाड यांचे निधन हे नैसर्गिक नसून व्यवस्थेने घेतलेला बळी असल्याचा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केला आहे.२०१५ मध्ये कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात समीर गायकवाड यांना नाहक अटक करण्यात आली होती. तपास यंत्रणांनी एका गाडीवरून आलेल्या दोन मारेकऱ्यांपैकी एक समीर गायकवाड असल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षदर्शी म्हणून सादर केलेल्या शाळकरी मुलाने वर्षभरानंतरच आरोपी वेगळे असल्याचे स्पष्ट केल्याने हा दावा कोसळला. याचाच अर्थ समीर गायकवाड निर्दोष होते, असे सनातन संस्थेचे म्हणणे आहे.
तरीही समीर गायकवाड यांना तब्बल १९ महिने तुरुंगात डांबून ठेवण्यात आले. नंतर त्यांना जामीन मिळाला; मात्र ‘पानसरे खून प्रकरणातील आरोपी’ अशी झालेली मोठ्या प्रमाणावरील बदनामी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. व्यवसाय, नोकरी आणि सामाजिक जीवन पूर्णतः उद्ध्वस्त झाले. सामान्य शेतकरी कुटुंबातील या निष्पाप साधकाला मानसिक छळ सहन करावा लागला, असे श्री. राजहंस यांनी सांगितले.
अटकवेळी तपासात समीर गायकवाड हे पानसरे यांच्या हत्येच्या दिवशी पालघर येथे होते, हे पोलिसांच्या निदर्शनास आले होते; मात्र दबावामुळे हा महत्त्वाचा पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आला नाही, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. जामीनानंतर पोलिसांनी नवीन ‘थिअरी’ मांडत पानसरे यांचा खून सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी केल्याचे जाहीर केले; त्यानंतर पुन्हा अन्य नावे पुढे आणण्यात आली. सदोष तपासाचा नाहक बळी समीर गायकवाड ठरल्याचे सनातन संस्थेचे म्हणणे आहे.
कोल्हापूरमध्ये त्यांना वकील मिळू दिला गेला नाही, हा लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्यावरचा आघात असल्याचा आरोप करत श्री. राजहंस यांनी तुलना मांडली की, “अजमल कसाबसारख्या अतिरेक्याला सरकारी खर्चाने वकील मिळतो; मात्र केवळ हिंदू, सनातन संस्थेचा साधक आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून समीर गायकवाड यांना न्यायप्रक्रियेत अडथळे आणले गेले.”
गायकवाड कुटुंबीयांच्या दुःखात सनातन परिवार सहभागी असून, न केलेल्या गुन्ह्यात अडकवल्याचा ताण समीर यांच्या मनावर सतत होता, असेही त्यांनी नमूद केले. स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूनंतर व्यक्त झालेल्या शोकसंवेदनांप्रमाणे समीर गायकवाड यांच्यासाठी कोणी उभे राहणार का, असा सवाल करत पुरोगामी दबावामुळे झालेल्या अन्यायाकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
समीर गायकवाड यांचे निधन म्हणजे व्यवस्थेने घेतलेला बळी – सनातन संस्था
|