बातम्या
सांगलीत रात्री उशिरापर्यंत स्थलांतर; १२५ कुटुंबातील ६१७ लोक सुरक्षित स्थळी
By nisha patil - 8/21/2025 4:05:43 PM
Share This News:
सांगलीत रात्री उशिरापर्यंत स्थलांतर; १२५ कुटुंबातील ६१७ लोक सुरक्षित स्थळी
कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या पुरामुळे सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या १७ तासांत कृष्णा नदीची पाणीपातळी तब्बल १० फूटांनी वाढली असून जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रस्ता, दत्तनगर, आरवाडे पार्क या भागात पाणी शिरले.या धोक्यामुळे १२५ कुटुंबांतील ६१७ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून ८ ठिकाणी मंगल कार्यालयांमध्ये तात्पुरती व्यवस्था केली आहे.
दरम्यान, कोयना धरणातील विसर्ग ९५,३०० क्युसेकवर स्थिर असून त्यात कपात करण्याबाबत विचार सुरू आहे. वारणा धरणातील विसर्गही ३२,६२७ वरून २९,८०७ क्युसेक करण्यात आला आहे.
पावसाचा जोर ओसरल्याने आणि पाण्याची पातळी स्थिरावल्याने महापुराचा तातडीचा धोका टळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
नदीकाठच्या नागरिकांनी मात्र रात्रभर जागरण केले. अनेकांनी घरातील साहित्य बांधून ठेवले, जनावरांना सुरक्षित स्थळी नेले आणि गरज भासल्यास स्थलांतरासाठी तयारी ठेवली. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सांगलीत रात्री उशिरापर्यंत स्थलांतर; १२५ कुटुंबातील ६१७ लोक सुरक्षित स्थळी
|