खेळ
'शाहू'च्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत संकेत पाटील व सृष्टी भोसले प्रथम
By nisha patil - 11/8/2025 6:05:01 PM
Share This News:
'शाहू'च्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत संकेत पाटील व सृष्टी भोसले प्रथम
कागल – श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत आयोजित ३९ व्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात पाचगावच्या संकेत पाटीलने एकोंडीच्या विवेक चौगुलेवर मात करत तर महिला गटात पिराचीवाडीच्या ‘शाहू’ची मानधनधारक सृष्टी भोसलेने गोकुळ शिरगावच्या सुकन्या मिठारीवर मात करून प्रथम क्रमांक पटकाविला.
विजेत्यांना कारखान्याचे व्हा. चेअरमन अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील, राजे बँकेचे संचालक एम.पी. पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेत पुरुष गटात पवन बराळे (कळंबा) व अतुल मगदूम (इस्पुर्ली) यांनी अनुक्रमे द्वितीय-तृतीय क्रमांक मिळवला, तर महिला गटात दिया हजारे (यळगुड) हिने तृतीय क्रमांक मिळवला. सर्व विजेत्यांना रोख रक्कम, पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरू झालेल्या या स्पर्धा सलग ३९व्या वर्षी पार पडल्या. यंदा महिला व पुरुष अशा ३८ गटांमध्ये विक्रमी ४५८ मल्लांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते झाले. अंतिम दिवशी गोडाऊन प्रेक्षकांनी फुलून गेले होते.
चार दिवस चाललेल्या या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण महाखेल स्पोर्ट्स यूट्यूब चॅनेलवरून भारतासह वीस देशांतील दीड लाखांहून अधिक कुस्ती शौकिनांनी पाहिले. महिला मल्लांच्या उत्स्फूर्त सहभागासह महिला प्रेक्षकांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ व बक्षीस वितरण होणे हा यंदाचा खास सन्मान ठरला.
'शाहू'च्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत संकेत पाटील व सृष्टी भोसले प्रथम
|