शैक्षणिक
दि. ३० डिसेंबर रोजी शिवाजी विद्यापीठात ‘संत साहित्य संमेलन’
By nisha patil - 12/27/2025 4:51:50 PM
Share This News:
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर आणि संत तुकाराम अध्यासन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी राजर्षी शाहू सिनेट सभागृह, शिवाजी विद्यापीठ येथे भव्य ‘संत साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाची सुरुवात सकाळी ९.०० वाजता ग्रंथदिंडीने होणार असून, ग्रंथदिंडीचे पालखी पूजन शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र. कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते होणार आहे. पारंपरिक वारकरी भजन, लेझिम आणि झिम्मा-फुगडी यांच्या साथीने ग्रंथदिंडी निघणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन सकाळी ११.०० वाजता संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्ष म्हणून संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. सतीश बडवे लाभणार आहेत. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी असणार आहेत. या सत्रात प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, प्रा. प्रवीण बांदेकर, प्रा. रणधीर शिंदे तसेच कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत ‘वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये ज्ञानेश्वर बंडगर, श्रीरंग गायकवाड, प्रा. डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. प्रभाकर देसाई, प्रा. प्रवीण बांदेकर आणि प्रा. अनिल गवळी सहभागी होणार आहेत. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे असणार आहेत.
दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत ‘वारी – एक आनंदयात्रा’ या विषयावर ज्येष्ठ छायाचित्रकार व वारीचे अभ्यासक संदेश भंडारे यांची मुलाखत होणार असून, संवादक म्हणून ज्ञानेश्वर बंडगर असणार आहेत. सायंकाळी श्री. दत्त भजनी मंडळ, शिपूर यांचे कबीरपंथी भजन तसेच शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाचा ‘अभंगवाणी’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.
या संत साहित्य संमेलनामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक प्रा. नंदकुमार मोरे यांनी पत्रकार परिषदेत केले.
दि. ३० डिसेंबर रोजी शिवाजी विद्यापीठात ‘संत साहित्य संमेलन’
|