राजकीय
गोकुळ अध्यादेशावर सतेज पाटील आक्रमक; ९ नोव्हेंबरला संघर्ष मोर्चा
By Administrator - 7/11/2026 11:34:13 AM
Share This News:
गोकुळच्या अध्यादेशावर सतेज पाटील आक्रमक; सरकारवर ‘सरकारी दरोड्या’चा आरोप, ९ नोव्हेंबरला संघर्ष मोर्चा!
कोल्हापूर :
गोकुळ दूध संघातील शासननियुक्त चार सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. अध्यादेशाच्या माध्यमातून गोकुळमध्ये आपल्या माणसांना घुसवून सभासदांचा कौल तुडवला जात असल्याचा आरोप त्यांनी ट्विटद्वारे केला आहे. तसेच या निर्णयाविरोधात ९ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
सतेज पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये, ‘तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता?’ असा सवाल उपस्थित केला आहे. चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणे म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान असल्याची टीकाही त्यांनी केली.
‘घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही!’ अशा शब्दांत त्यांनी सरकारला लक्ष्य केले. कोल्हापूरचा स्वाभिमान कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या निर्णयाविरोधात आता संघर्षाची भूमिका घेत सतेज पाटील यांनी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कोल्हापुरातील दसरा चौकातून संघर्ष मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. ‘आता यायला लागतंय, कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा’ असे म्हणत त्यांनी कोल्हापूरकरांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
गोकुळमधील शासननियुक्त सदस्यांच्या मतदानाच्या अधिकारावरून सुरू झालेला वाद आता रस्त्यावर उतरण्याची चिन्हे आहेत. या संघर्ष मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो आणि सरकार या विरोधावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गोकुळ अध्यादेशावर सतेज पाटील आक्रमक; ९ नोव्हेंबरला संघर्ष मोर्चा
|