बातम्या

सतेज कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी; दुर्मिळ जनावरे व भाजीपाला ठरले आकर्षण

Satej krushi exibition


By nisha patil - 7/12/2025 3:33:45 PM
Share This News:



सतेज कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी; दुर्मिळ जनावरे व भाजीपाला ठरले आकर्षण

कोल्हापूर/प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “सतेज कृषी प्रदर्शन २०२५” च्या शनिवारी दुसऱ्या दिवशी शेतकरी, नागरिक, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी गर्दी उसळली. डी. वाय. पाटील ग्रुप, कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तपोवन मैदानावर हे प्रदर्शन भरत असून यंदा सातवे वर्ष आहे.

अडीचशेहून अधिक स्टॉल, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, पशुपक्षी दालने, शेती अवजारे, बी-बियाणे, खते, आयुर्वेदिक औषधे, विदेशी भाजीपाला, दुर्मिळ फुले आणि तांदूळ–धान्य महोत्सव अशा विविध विभागांत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

दुर्मिळ जनावरे ठरली आकर्षण

 

कागल येथील हैदर भाई फार्मचे अमेरिकन १८ इंचाचे बोकड, जाफराबादी सुलतान रेडा, भैरू रेडा, सोन्या बैल, गोल्डन कुत्रा, तसेच कोल्हापूरचा भुत्या घोडा यांना मोठी दाद मिळाली.

गिनीज व इंडिया बुक रेकॉर्ड धारक साताऱ्याच्या मलवडी गावातील तीन फुटांची "राधा" म्हैस हे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले. तिच्यावर राहुरी व परभणी विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू असून, महाराष्ट्र शासनाच्या आगामी महा पशुधन एक्स्पोसाठी तिची निवड झाली आहे.

विदेशी–स्थानिक भाजीपाला आणि फळांची रेलचेल

१० किलोचा भोपळा, १५ किलोचा कोहळा, काटेरी केळफुल, ईश्वर फुल, १८ इंची लाल–हिरवी मिरची, राधानगरीची लाल केळी, अडीच किलो दुधी भोपळा, पुना काकडी, २० किलोचा केळीचा घड, पाच किलोचा कोबी, झुकिनी, ब्रोकोली, अनन्या प्रकारचे विदेशी भाजीपाला व फुले पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली.

दोन दिवसांत सव्वा दोन कोटींची उलाढाल

शेतीसाठी लागणारे साहित्य, यंत्रसामग्री, बियाणे, खते व कृषी उत्पादने यांच्या खरेदी-विक्रीतून दुसऱ्या दिवशी एकूण सव्वा दोन कोटींच्या आसपास उलाढाल झाली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

 

धान्य व तांदूळ महोत्सवात मोठी विक्री

 

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रमात दोन दिवसांत खालील प्रमाणे विक्री झाली :

 

सेंद्रीय गूळ : १५०० kg

 

इंद्रायणी तांदूळ : २७०० kg

 

आजरा घनसाळ : २५०० kg

 

इंद्रायणी कणी : १००० kg

 

रत्नागिरी २४ : २००० kg

 

सेंद्रीय हळद : ७०० kg

 

नाचणी : ८०० kg

कृषी तंत्रज्ञानाचे डेमो व मार्गदर्शन

कृषी विभाग, पशुसंवर्धन, आत्मा व कृषी विज्ञान केंद्र यांनी गोशाळा घनजीवामृत, ड्रिप सिंचन, ड्रोन फवारणी, एआय तंत्रज्ञान, कीड व्यवस्थापन, अपघात विमा योजना, वॉटरशेड प्रकल्प अशा विविध योजनांचे डेमो सादर केले.

 

सुपर के नर्सरी तंत्रज्ञान, स्मार्ट शेती, पाचट व्यवस्थापन, सेंद्रिय शेती या विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले.

जनआकर्षण – फुले, पक्षी, पशुधन

कबुतरे, टर्की, रंगीत बदक, राजहंस, लव्हबर्ड, पांढरे उंदीर, ब्ल्यू गोल्ड मकाऊ, ससे, मांजरी, तसेच जर्बेरा, निशिगंध, बटन शेवंती आदी फुलांचे स्टॉल देखील झळकले.

आयोजकांचे आवाहन

 

हे प्रदर्शन पुढील दोन दिवस शेतकऱ्यांसाठी खुले असून शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सतेज पाटील व आयोजकांनी केले. सायंकाळी सरगम कराओकेचा संगीत कार्यक्रम रंगला.

 


सतेज कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी; दुर्मिळ जनावरे व भाजीपाला ठरले आकर्षण
Total Views: 55