बातम्या

तिन्ही जिल्ह्यांचा विकास आराखडा सरकारसमोर सादर होणार : आमदार सतेज पाटील

Satej patil1


By nisha patil - 9/28/2025 11:44:57 PM
Share This News:



तिन्ही जिल्ह्यांचा विकास आराखडा सरकारसमोर सादर होणार : आमदार सतेज पाटील


कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांचा “डेव्हलपमेंट कॉरिडॉर” उभारण्यासाठी उद्योगांच्या नव्या संकल्पना, दळणवळणाच्या सुविधा आणि कौशल्य विकास यांचा संगम साधावा, असा सूर हॉटेल सयाजी येथे झालेल्या व्हिजन बैठकीत उमटला.

 

या बैठकीतून तयार होणारे व्हिजन डॉक्युमेंट सर्व पक्षीय आमदार, मंत्री आणि सरकारसमोर सादर करण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.

या बैठकीत उद्योग, पर्यटन, हॉटेल व्यवसाय, क्रीडा, पर्यावरण, बांधकाम, कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या सूचना मांडल्या. औद्योगिक व कृषी उत्पादनांची जलद वाहतूक, अॅग्रो टुरिझम, पर्यटनस्थळांची जोडणी, ड्राय हब, मेट्रो रेल्वे, तसेच विमानतळ आणि सर्किट बेंच यामुळे मिळणाऱ्या कनेक्टिव्हिटीचा लाभ या कॉरिडॉरच्या माध्यमातून तीन जिल्ह्यांना मिळू शकतो, यावर सर्वानुमते चर्चा झाली.

आमदार सतेज पाटील म्हणाले की, “कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे भौगोलिक दृष्ट्या जोडले गेलेले आहेत. त्यामुळे पुढील १५ वर्षांच्या विकासाचे नियोजन करून औद्योगिक, पर्यटन, कृषी आणि दळणवळणाच्या सोयींनी समृद्ध असे विकास मॉडेल तयार करणे ही काळाची गरज आहे.”

या बैठकीस उद्योगपती गिरीश चितळे, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, आनंद माने, उज्वल नागेशकर, संजय शेटे, राजीव पारिख, के. पी. खोत, पत्रकार श्रीराम पवार, निखिल पंडितराव, श्रीरंग गायकवाड, शिक्षणतज्ज्ञ डॉ. उदय दबडे, डॉ. नितीन सोनजी, डॉ. अनिल कोळेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या चर्चेतून कोल्हापूर सांगली सातारा कॉरिडॉर उभारणे ही काळाची गरज असल्याचे सर्वमान्य मत नोंदवण्यात आले.


तिन्ही जिल्ह्यांचा विकास आराखडा सरकारसमोर सादर होणार : आमदार सतेज पाटील
Total Views: 80