बातम्या

गोरगरिबांच्या कल्याणातून समाधान — मंत्री हसन मुश्रीफ यांचे उद्गार

Satisfaction comes from the welfare of the poor


By nisha patil - 1/11/2025 2:40:27 PM
Share This News:



गोरगरिबांच्या कल्याणातून समाधान — मंत्री हसन मुश्रीफ यांचे उद्गार
 

कागलमध्ये बांधकाम कामगारांना साहित्य संचांचे वाटप; कोल्हापूर जिल्ह्याच्या योजनेचा प्रारंभ

कागल, दि. ३१ : गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना राबवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे सुख आणि समाधान मोठे आहे, असे भावनिक उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. “गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हास्य बघण्याचं चक्क वेडच मला आहे,” असे ते म्हणाले.

कागलमध्ये नवीन योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक साहित्य संच व सुरक्षितता साहित्य संचांचे वाटप मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याच्या या योजनेचा शुभारंभ कागलमधून करण्यात आला.

या वेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, “मला गोरगरिबांची सेवा आणि त्यांचे कल्याण करण्याचा छंद जडलेला आहे. कामगार कल्याण मंत्री म्हणून काम करताना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. राज्य सरकारकडून एक रुपयाही न घेता बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी मोठे कार्य उभे केले आहे.”

कागल विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगारांच्या मुलांना केवळ शैक्षणिक शिष्यवृत्तीपोटी तब्बल ८९ कोटी रुपये मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

“गोरगरिबांची सेवा अंतःकरणातून असावी लागते. तात्पुरत्या ढोंगाने एवढे मोठे काम उभे राहात नाही. निराधार पेन्शन वाढ आणि आरोग्यसेवा ह्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर काम केले आहे,” असे मुश्रीफ म्हणाले.

शेतकऱ्यांविषयी बोलताना त्यांनी सांगितले, “शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो आत्मनिर्भर व्हावा यासाठी शासनाने समिती नेमली आहे. कर्जमाफी योजनेत नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक सवलती मिळाव्यात. तसेच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत, यासाठीही उपाययोजना व्हाव्यात.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष मनोजभाऊ फराकटे, बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील, दलितमित्र बळवंतराव माने, प्रवीण काळबर, संजय चितारी, सौरभ पाटील, अस्लम मुजावर, विवेक लोटे, नवाज मुश्रीफ, बच्चन कांबळे, प्रकाश सोनुले, राजु शानेदिवान, सुधाकर सोनुले, किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी केले. प्रास्ताविक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी तर आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चितारी यांनी मानले.


गोरगरिबांच्या कल्याणातून समाधान — मंत्री हसन मुश्रीफ यांचे उद्गार
Total Views: 40