बातम्या
गोकुळ निवडणुकीत सत्यजित पाटील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीसोबत भूमिका केली स्पष्ट :
By nisha patil - 9/24/2026 9:02:00 PM
Share This News:
गोकुळ निवडणुकीत सत्यजित पाटील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीसोबत भूमिका केली स्पष्ट :
कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला पाठिंबा देऊन या आघाडीसोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतला असल्याची माहिती माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे गुरुवारी दिली. शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातून आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा अर्ज दाखल न करता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यात आल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
गोकुळच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यापूर्वी स्वतंत्रपणे ठराव दाखल करण्यात आले होते. मात्र, सर्व ठरावधारक, दूध उत्पादक, दूध संस्था, कामगार आणि कार्यकर्त्यांसोबत आघाडीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत बहुतांश ठरावधारक व कार्यकर्त्यांनी दूध उत्पादक, दूध संस्था आणि कामगारांच्या हितासाठी समविचारी आघाडीला पाठिंबा देण्याचा आग्रह केला. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
गोकुळ दूध संघामुळे ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांत मोठी उभारी मिळाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. दूध उत्पादक, ठरावधारक आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा सन्मान करून समविचारी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला जिल्ह्यातील ठरावधारक आणि दूध उत्पादकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पाटील यांनी केला. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत समविचारी आघाडीला मोठे यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान मंगळवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सरुड येथे शाहुवाडी तालुक्यातील ठरावधारकांचा मेळावा आमदार सतेज पाटील, माजी आमदार सत्यजीत पाटील- सरूडकर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आला आहे.
शाहूवाडी-पन्हाळ्यात कुटुंबाला उमेदवारी नाही
शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातून आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा उमेदवारी अर्ज दाखल न करता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. आघाडीतील प्रमुखांशी उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर आघाडीतील सर्व उमेदवारांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचेही सत्यजित पाटील यांनी सांगितले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील दूध संस्था आणि ठरावधारकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता ठामपणे पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
गोकुळ निवडणुकीत सत्यजित पाटील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीसोबत भूमिका केली स्पष्ट :
|