बातम्या

सौर ऊर्जेतून कृषिपंपाना वीज देण्यात महावितरणची कामगिरी दिशादर्शक

Saururja in mahavitran


By nisha patil - 4/16/2026 12:31:49 PM
Share This News:



सौर ऊर्जेतून कृषिपंपाना वीज देण्यात महावितरणची कामगिरी दिशादर्शक

मध्यप्रदेश वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कौतुकोद्गार

मुंबई,  मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० तसेच मागेल त्याला सौर कृषिपंप या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत महावितरणची कामगिरी इतर राज्यांसाठी दिशादर्शक आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सुरु असलेल्या या योजनांची माहिती घेतल्यानंतर मध्यप्रदेशच्या पथकाकडून हे गौरवोद्गार काढण्यात आले. 

मध्यप्रदेशच्या पथकाने अभ्यास दौऱ्यात बुधवारी (१५ एप्रिल) महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे सौर ऊर्जेतून कृषिपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती घेतली. संचालक (संचालन/प्रकल्प) सचिन तालेवार, कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर, मुख्य अभियंते ज्ञानेश कुलकर्णी, पंकज तगलपल्लेवार, विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट यांनी सादरीकरणाच्या माध्मातून योजनांची सविस्तर माहिती दिली. मध्यप्रदेशच्या पथकात मध्यप्रदेश पॉवर मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य महाव्यवस्थापक गुरुदीप सिंग कनुजा, सहाय्यक महाव्यवस्थापक धिरज कुमार मुनिया, अधीक्षक अभियंता चिंतामणी ठाकर, व्यवस्थापक शंकर नारायण अग्रवाल, विनोद राऊत यांचा समावेश होता.

 

जगातील सर्वांत मोठा १६ हजार मेगावॅट विक्रेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्प असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० मध्ये आतापर्यंत ३ हजार १८७ कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात आले असून राज्यातील तब्बल १२ लाख ८२ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा ४ हजार ७७९ मेगावॅट विजेचा पुरवठा उपलब्ध झाला आहे. या योजनेमुळे ६५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ७० हजारांवर ग्रामीण रोजगार निर्मिती सुरू आहे. तसेच महावितरणच्या वीज खरेदीमध्ये १० हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये १३ हजार ५०० कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे.

 

याशिवाय मागेल त्याला सौर कृषिपंप या योजनेसह विविध योजनांमधून राज्यात ९ लाख १७ हजार ५८७ कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. देशभरात बसवण्यात आलेल्या एकूण ऑफ ग्रीड सौर कृषिपंपांपैकी ६४ टक्के कृषिपंप एकट्या महाराष्ट्रात बसविण्यात आले आहेत. विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून राज्यातील ३२ लाख ७६ हजार म्हणजेच एकूण कृषिपंपांपैकी ७३ टक्के कृषिपंपांना सध्या दिवसा वीज पुरवठा सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

 

*फोटोओळ* – महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथे मध्यप्रदेश वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देताना संचालक (संचालन/प्रकल्प) सचिन तालेवार, कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर आदी. 

---


सौर ऊर्जेतून कृषिपंपाना वीज देण्यात महावितरणची कामगिरी दिशादर्शक
Total Views: 20