बातम्या

पोलिसांची अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; ५.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त..

Savantwadi


By nisha patil - 6/14/2026 11:07:19 AM
Share This News:



पोलिसांची अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; ५.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त..

सावंतवाडी : गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात बांदा पोलिसांनी सलग दोन यशस्वी कारवाया करत तब्बल ५ लाख ९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एक दुचाकी, एक चारचाकी वाहन तसेच मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला.

पहिली कारवाई गुरुवारी रात्री बांदा पोलिसांच्या तपासणी नाक्यावर करण्यात आली. यावेळी नागेश आनंद चव्हाण (रा. ओसरगाव, ता. कणकवली) हा दुचाकीवरून गोवा मद्याची वाहतूक करताना पोलिसांच्या ताब्यात आला. त्याच्याकडून विविध ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या व दुचाकीसह ४९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यानंतर शुक्रवारी पहाटे त्याच ठिकाणी करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत सुधीर खुबू राठोड (रा. साहिलवाडा, ता. सावंतवाडी) याच्या ताब्यातील टोयोटा ग्लांझा कारची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा मद्य आढळून आले. यामध्ये मॅकडॉवेल्स, इम्पिरियल ब्ल्यू आणि गोल्डन एस व्हिस्कीच्या बाटल्यांचा समावेश होता. या प्रकरणात कारसह ४ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवघ्या काही तासांच्या अंतराने झालेल्या या दोन कारवायांमुळे अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गोवा सीमेलगतच्या भागातून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीवर पोलिसांनी प्रभावी अंकुश ठेवण्यास सुरुवात केली असून, अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

ही कारवाई बांदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, सहाय्यक फौजदार गवस, हेड कॉन्स्टेबल विलास भोगले, प्रथमेश पोवार, प्रसाद पाटील आणि राजा कापसे यांनी केली.


पोलिसांची अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; ५.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त..
Total Views: 22