बातम्या
अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी द्या-ग्रामीण भागातील पालकांचे तहसीलदार यांना निवेदन*
By nisha patil - 7/7/2026 8:51:22 PM
Share This News:
*अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी द्या-ग्रामीण भागातील पालकांचे तहसीलदार यांना निवेदन*
**आजरा(हसन तकीलदार)*:-मागील पाच सहा दिवसापासून आजऱ्यात मुसळधार आणि संततधार पाऊस सुरु आहे. त्याचबरोबर सोसाट्याचा वाराही सुरु असून झाडांची व घरांची पडझड सुरूच आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी शाळेसाठी प्रवास करावा लागतो. आणि हा प्रवास धोकादायक असल्याने अतिवृष्टीकाळात शाळांना सुट्ट्या द्याव्यात अशी मागणी ग्रामीण भागातील पालकांनी आजरा तहसीलदार समीर माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,गेले आठवडाभर सातत्याने मुसळधार व संततधार पाऊस पडत असून आजाऱ्याच्या ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. साधारण 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यास शासन नियमानुसार अतिवृष्टी झाल्याचे समजले जाते. पण सध्या आजऱ्याचा विशेषतः पश्चिम पट्ट्यांमध्ये जवळपास 200 मि.मी.पाऊस पडत असून नदी,ओढे तसेच नाल्यांना प्रचंड पूर आलेला आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळली असून काही ठिकाणी दळणवळणाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी शाळेसाठी परगावी किंवा आजऱ्यामध्ये येत असतात. अतिवृष्टीच्या या परिस्थितीमध्ये दळणवळण खंडित झाले असून वीज पुरवठाही पूर्णपणे खंडीत आहे. यामुळे संपर्क करणे अडचणीचे होत आहे.प्रचंड पाऊस आणि वादळमुळे कोणतीही जीवित हानी होऊ शकते.तसेच ओढ्याना आणि नद्यांना आलेल्या पु्रांमळे मुलांच्या जीविताला धोका होऊ शकतो. हे टाळता यावे यासाठी किमान पावसाचा जोर ओसरेपर्यंत दहावीपर्यंतच्या शाळांना सुरक्षिततेच्या कारणास्तव सुट्टी द्यावी अशी मागणी पालकांनी निवेदनाद्वारे आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांच्याकडे करण्यात आली. यावेळी विविध गावातील महिला व पालक उपस्थित होते. निवेदनावर सारिका कुकडे, रेश्मा वंजारे, सरिता इलगे, सानिका जाधव, तेजस्विनी देसाई, श्वेता सरदेसाई, विद्या निर्मळे, स्वप्नाली राणे, सारिका खांडेकर, रणजितकुमार सरदेसाई, धनाजी पोवार, विष्णू कुंभार, डॉ. धनाजी राणे आदींच्या सह्या आहेत.
अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी द्या-ग्रामीण भागातील पालकांचे तहसीलदार यांना निवेदन*
|