बातम्या
खाजगी शाळांमहाविद्यालयात डोनेशनच्या नावाखाली होणाऱ्या लुटची चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई करा-भारतीय विद्यार्थी मोर्चा पार्टी
By nisha patil - 6/6/2026 11:34:53 AM
Share This News:
**खाजगी शाळांमहाविद्यालयात डोनेशनच्या नावाखाली होणाऱ्या लुटची चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई करा-भारतीय विद्यार्थी मोर्चा पार्टी
**आजरा(हसन तकीलदार)*:-जिल्ह्यातील खाजगी शाळा व महाविद्यालयामध्ये प्रवेश दरम्यान अतिरिक्त शुल्क, डोनेशन व इतर नावाखाली होत असलेल्या कथित आर्थिक वसुलीची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन भारतीय विद्यार्थी मोर्चा पार्टी,आजरा तर्फे शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,भारतीय राज्यघटनेने प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा मौलिक अधिकार दिलेला असताना जिल्हा तसेच विविध तालुक्यांमध्ये शिक्षणाचे खुलेआम व्यापारीकरण होत असल्याचे चित्र समोर येत आहे. इयता 11 वी व 12 वी तसेच इतर वर्गांच्या प्रवेशासाठी शासनाने निश्चित केलेल्या शुल्का व्यतिरिक्त हजारो रुपयांची अतिरिक्त रक्कम विद्यार्थी व पालकांकडून मागितली जात असल्याच्या अनेक तक्रारी भारतीय विद्यार्थी मोर्चाकडे प्राप्त झाल्या आहेत.विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये अधिकृत शुल्का व्यतिरिक्त "कॉपी सेंटर", "डोनेशन", "विशेष प्रवेश शुल्क" किंवा इतर विविध नावांनी रक्कम मागितली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
सध्या जिल्ह्यात आर्टस् साठी 5,000ते 6,000,कॉमर्ससाठी 5,000 ते 10,000,सायन्ससाठी 10,000 ते 30,000 असे कथित शुल्क आकारले जात असल्याची माहिती पालकांकडून मिळत आहे
ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी आहे. अनेक पालक तक्रार करण्यास तयार असले तरी आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता, शैक्षणिक त्रासाची भीती व संस्थांकडून होणाऱ्या संभाव्य दबावामुळे उघडपणे पुढे दाद मागण्यास घाबरत आहेत.
शिक्षण क्षेत्र हे समाज घडविण्याचे माध्यम आहे; मात्र काही संस्थांकडून त्याचे व्यापारीकरण होत असल्यास ते थांबविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणणे तसेच या प्रकरणात दोषींवर योग्यती कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे.
यासाठी जिल्ह्यातील सर्व खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेची विशेष चौकशी करण्यात यावी.
शासनमान्य शुल्क संरचनेचे पालन होते की नाही याची तपासणी करण्यात यावी.
अतिरिक्त शुल्क, डोनेशन किंवा "कॉपी सेंटर'च्या नावाखाली रक्कम वसूल करणाऱ्या संस्थांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.पालक व विद्यार्थ्यांसाठी गोपनीय तक्रार नोंदविण्याची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात यावी.प्रत्येक संस्थेला शुल्क संरचना सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात यावेत.आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक दबावाशिवाय प्रवेश मिळण्याची हमी देण्यात यावी. संपूर्ण प्रकरणाची जिल्हास्तरीय समितीमार्फत चौकशी करून अहवाल सार्वजनिक करण्यात यावा.विद्यार्थ्यांचे शिक्षण हा कोणाचाही व्यवसाय नसून त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा भारतीय विद्यार्थी मोर्चा या राष्ट्राव्यापी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी उग्र आंदोलन करण्यात येईल. याची गंभीरतेने नोंद घ्यावी. तसेच, या संदर्भात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती आम्हाला "bvmbymbbm1818@gmail.com"
या भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या अधिकृत मेल द्वारे कळवण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे.याच्या प्रती जिल्हा व राज्य पातळीवरील सर्व संबंधित अधिकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चा पार्टीचे हर्षवर्धन कांबळे, परशुराम कांबळे, डॉ. सुदाम हरेर, शेखर कांबळे, दशरथ सोनुले, अमित सुळेकर, राहुल मोरे, नितीन राऊत आदिजण उपस्थित होते.
खाजगी शाळांमहाविद्यालयात डोनेशनच्या नावाखाली होणाऱ्या लुटची चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई करा-भारतीय विद्यार्थी मोर्चा पार्टी
|