बातम्या
अनधिकृत नळ कनेक्शनधारकांची धावपळ! ७८ जणांनी भरला १९.५० लाखांचा दंड
By nisha patil - 8/10/2026 3:07:28 PM
Share This News:
अनधिकृत नळ कनेक्शनधारकांची धावपळ! ७८ जणांनी भरला १९.५० लाखांचा दंड
कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी, कळंबा आणि पाडळी परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दोन्ही केंद्रांवर नागरिकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. मोरया हॉल (बोंद्रे नगर) आणि साळोखे हॉल (कळंबा) येथे आयोजित कॅम्पमध्ये तब्बल ८७ नागरिकांनी नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी अर्ज केले. त्यापैकी ७८ नागरिकांनी प्रत्येकी २५ हजार रुपये दंड भरला. यातून महापालिकेच्या तिजोरीत एकूण १९ लाख ५० हजार रुपयांचा दंड जमा झाला असून, संबंधित नागरिकांची नळ कनेक्शन्स अधिकृत करण्यात आली.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, उपायुक्त नागेंद्र मुतकेकर आणि जल अभियंता जयेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, अद्याप अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत न केलेल्या नागरिकांसाठी १३ ऑक्टोबर २०२६ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीपूर्वी नागरिकांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपले कनेक्शन अधिकृत करून घ्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. मुदत संपल्यानंतर अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्यात येणार असून, संबंधितांविरोधात फौजदारी कारवाई केली जाईल, असा सक्त इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे.
अनधिकृत नळ कनेक्शनधारकांची धावपळ! ७८ जणांनी भरला १९.५० लाखांचा दंड
|