विशेष बातम्या
ऊसदरावरून स्वाभिमानींची हाक! गडहिंग्लजपासून १५ गावांत पदयात्रा; ३६०० रुपयांच्या दरासाठी लढा कायम
By nisha patil - 11/13/2025 4:27:22 PM
Share This News:
ऊसदरावरून स्वाभिमानींची हाक! गडहिंग्लजपासून १५ गावांत पदयात्रा; ३६०० रुपयांच्या दरासाठी लढा कायम
गडहिंग्लज साखर कारखान्याने ऊसाचा दर ३४०० रुपये जाहीर केला असला तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तो दर नाकारला आहे. ३६०० रुपये पहिली उचल आणि थकित एफआरपीची ३१ कोटी रुपयांची मागणी मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारपासून (ता. १४) १५ गावांतून भव्य पदयात्रेला सुरुवात होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नूल येथून सकाळी आठला पदयात्रेचा शुभारंभ होणार असून गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, भगवानगिरी महाराज यांच्या उपस्थितीत यात्रा प्रारंभ होईल. पहिल्या दिवशी पदयात्रा मुगळी, जरळी, दुंडगे, गडहिंग्लज, भडगाव, हुनगिनहाळ, हरळी बुद्रुक, हरळी खुर्द, महागाव या गावांतून जाणार आहे. महागाव येथे रात्री जाहीर सभा होणार आहे.
शनिवारी (ता. १५) पदयात्रा महागाव, उंबरवाडी, सुळे, बटकणंगले, शिप्पूर तर्फ नेसरी, नेसरी या गावांतून पुढे जाईल. नेसरीतील मसणाई मंदिरात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे.
या पदयात्रेत बसवराज मुत्नाळे, दिलीप बेळगुद्री, धनाजी पाटील, बाळगोंडा पाटील, अशोक पाटील, मलाप्पा आमाते, सुरेश चौगुले, उत्तम पाटील, श्रीधर पाटील आदींचा सहभाग असणार आहे.
ऊसदरावरून स्वाभिमानींची हाक! गडहिंग्लजपासून १५ गावांत पदयात्रा; ३६०० रुपयांच्या दरासाठी लढा कायम
|