बातम्या
कोल्हापुरात ज्येष्ठ महिलेला गंडा! ६० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; पुण्यातील महिला जेरबंद
By nisha patil - 11/25/2026 3:48:19 PM
Share This News:
कोल्हापुरात ज्येष्ठ महिलेला गंडा! ६० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; पुण्यातील महिला जेरबंद
कोल्हापुरातील जिल्हा परिषद परिसरात ज्येष्ठ महिलेला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. अनोळखी महिलेने ओळख निर्माण करत ज्येष्ठ महिलेचा विश्वास संपादन केला आणि संधी साधून सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवत पुण्यातील संशयित महिला आरोपीला ताब्यात घेतले आहे.
२१ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास जिल्हा परिषद परिसरातील रस्त्यावरून ६५ वर्षीय कस्तुरी अथनीकर जात असताना अनोळखी महिलेने त्यांना गाठले. बोलण्यात गुंतवून त्यांची ओळख मिळवली आणि हातचलाखीने सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दोन तपास पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळवत आरोपीचा माग काढला. अखेर या तपासातून कमल उर्फ कमू गोपीचंद शिंदे (वय ५५, रा. लोणी काळभोर, पुणे) या महिलेला ताब्यात घेण्यात आले असून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार पुन्हा समोर येत असल्याने अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
कोल्हापुरात ज्येष्ठ महिलेला गंडा! ६० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; पुण्यातील महिला जेरबंद
|