विशेष बातम्या
पन्हाळा पोस्ट कार्यालयात सेवा ठप्प; नागरिक व पर्यटकांची होरपळ
By nisha patil - 7/17/2025 3:14:26 PM
Share This News:
पन्हाळा पोस्ट कार्यालयात सेवा ठप्प; नागरिक व पर्यटकांची होरपळ
आधार सेवा बंद, ७० जण वेटिंग लिस्टमध्ये अडकले
शहाबाज मुजावर, पन्हाळा युनेस्को दर्जा लाभलेल्या ऐतिहासिक पन्हाळा गडावर असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये सध्या मूलभूत सेवा ठप्प झाल्या आहेत. AEPS (Aadhaar Enabled Payment System) सेवा आणि आधार कार्ड संबंधित सेवा बंद असल्यामुळे स्थानिक नागरिक, पर्यटक, तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पन्हाळा तालुक्याचा कारभार 123 गावांवर पसरलेला असून, येथे दररोज हजारो पर्यटक भेट देतात. केंद्र सरकारच्या जाहिरातीनुसार, कोणत्याही बँकेत खाते असलेल्या नागरिकांना पोस्ट कार्यालयात आधार व मोबाईल लिंक करून पैसे काढण्याची सुविधा असते. मात्र, पन्हाळ्याच्या पोस्ट कार्यालयात ही सेवा पुरवली जात नाही.
स्थानिक व्यावसायिक जितेंद्र पवार यांनी सांगितले की, गेले दोन दिवस ते पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गेले होते, पण त्यांना पैसे मिळाले नाहीत. कर्मचाऱ्यांकडून चुकीची माहिती दिली जाते, तर कधी कर्मचारीच अनुपस्थित असतात. यामुळे काही जण ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या नावाखाली रोखीने पैसे घेत असल्याचे प्रकारही निदर्शनास येत आहेत.
आधार कार्ड सेवा देखील ठप्प
गेल्या दोन महिन्यांपासून आधार कार्ड सेवा देखील अपूर्ण क्षमतेने सुरू होती. दररोज केवळ दोन नागरिकांना सेवा दिली जात होती. मे व जून महिन्यात केवळ ४२ लोकांनी लाभ घेतला, तर ७० जण अजूनही वेटिंगवर होते. सध्या ही सेवा पूर्णपणे बंद आहे व पुन्हा केव्हा सुरू होईल, याबाबत कोणतीही शाश्वती नाही.
शासनाचे कार्यालय असूनही सेवा नाही
पन्हाळा हा तालुका ठिकाण असून येथे सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये कार्यरत आहेत. आधारशिवाय जन्म दाखला, शाळा प्रवेश, निवडणूक ओळखपत्र, बँक व्यवहार, अपंगत्व प्रमाणपत्र यांसारखी अनेक कामे होऊ शकत नाहीत. त्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत.
निष्काळजीपणा व प्रशासनाचा हलगर्जीपणा
सेवा ठप्प होण्यामागे कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा, वरिष्ठांचा वचक नसणे, व व्यवस्थापनातील अपयश कारणीभूत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शासनाच्या नावावर सुरू असलेल्या या केंद्रातून नागरिकांना अपेक्षित सेवा मिळत नसेल, तर हा प्रशासनाचा स्पष्ट अपमान असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
पन्हाळा पोस्ट कार्यालयात सेवा ठप्प; नागरिक व पर्यटकांची होरपळ
|