बातम्या
महावितरणतर्फे कोल्हापूर जिल्ह्यात 'सेवा सेतू कॅम्प'चे आयोजन
By nisha patil - 9/22/2026 7:49:56 PM
Share This News:
महावितरणतर्फे कोल्हापूर जिल्ह्यात 'सेवा सेतू कॅम्प'चे आयोजन
वडगाव उपविभागात आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते कॅम्पचा शुभारंभ
इचलकरंजी उपविभागात 83 ग्राहकांनी घेतला लाभ
कोल्हापूर, दि. 22 सप्टेंबर, 2026 : 'पीएम सूर्य घर मोफत वीज योजना' आणि 'स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट)' योजना तसेच अन्य योजनांची माहिती एकाच छताखाली मिळण्याकरिता जिल्ह्यात विविध ठिकाणी 'सेवा सेतू कॅम्प'चे विशेष आयोजन करण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी असे कॅम्प आयोजित करण्यात येत असून वडगाव उपविभाग अंतर्गत उभारण्यात आलेल्या कॅम्पचे उद्घाटन आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आले. तर इचलकरंजी उपविभागातील कॅम्पचा 83 ग्राहकांनी लाभ घेतला.
केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत 'सेवा सेतू कॅम्प'चे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. या मोहिमेअंतर्गत 'पीएम सूर्य घर मोफत वीज योजना' आणि 'स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट)' योजनेची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महावितरण स्थानिक पातळीवर कॅम्पचे आयोजन करत आहे.
वडगाव उपविभागात स्मार्ट योजना, पीएम सूर्यघर योजना तसेच विविध योजनांचे फॉर्म भरून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. वडगाव उपविभागातील कॅम्प आठ दिवस उपलब्ध असून जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार अशोकराव माने यांनी केले आहे. यावेळी विविध सोलर एजन्सी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इचलकरंजी उपविभागात आजअखेर इचलकरंजी महानगरपालिका व कबनूर अशा दोन ठिकाणी कॅम्प झाले असून यामध्ये एकूण 83 ग्राहकांनी लाभ घेतला आहे.
या कॅम्पच्या माध्यमातून ग्राहकांना योजनांचा लाभ घेण्याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करून योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, याचे थेट प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले जात आहे. यावेळी अनेक ठिकाणी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. त्यामुळे योजनेकरिता व कर्जासाठी एकाच ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा आहे. ‘वीज ग्राहक हा महावितरणच्या केंद्रस्थानी असून त्यांना स्थानिक पातळीवर सेवा सेतु कॅम्पद्वारे अधिकाधिक चांगली सेवा द्यावी’, असे आदेश जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी दिले आहेत.
महावितरणतर्फे कोल्हापूर जिल्ह्यात 'सेवा सेतू कॅम्प'चे आयोजन
|