बातम्या
शहाजी महाविद्यालय क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर चषकाचे उपविजेते
By nisha patil - 8/22/2025 4:10:29 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालय क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर चषकाचे उपविजेते
कोल्हापूर : दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठ आयोजित सन 2023-24 च्या क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर चषकाचे उपविजेतेपद पटकावले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते महाविद्यालयाला चषक व २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण व जिमखाना प्रमुख कॅप्टन डॉ. प्रशांत पाटील यांचाही विशेष गौरव करण्यात आला. या यशाबद्दल श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे व प्रशासन अधिकारी श्री मनीष भोसले यांनी अभिनंदन केले.
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातील ३६ खेळाडूंनी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यात पॉवरलिफ्टिंगमध्ये ऋतुराज पाटीलने सुवर्णपदक, कयाकिंगमध्ये धनश्री धोकटेने रौप्य पदक व जलतरणात पृथ्वीराज डांगेने कास्यपदक जिंकून महाविद्यालयाचा गौरव वाढविला.
तसेच फुटबॉल (पुरुष), बेसबॉल-सॉफ्टबॉल (पुरुष), हॉकी (महिला) व क्रिकेट (महिला) या खेळांमध्ये शिवाजी विद्यापीठस्तरावर चॅम्पियनशिप पटकावली. वर्षभरात सुमारे २०० हून अधिक खेळाडूंनी विद्यापीठ विभागीय व अंतरविभागीय स्पर्धेत सहभाग घेतला.
या यशामागे संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, प्राचार्य डॉ. शानेदिवाण, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले तसेच जिमखाना विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
या गौरवामुळे शहाजी महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शहाजी महाविद्यालय क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर चषकाचे उपविजेते
|