बातम्या

ख्यातनाम शाहीर संभाजी भगत यांना यावर्षीचा लोकशाहीर द.ना.गव्हाणकर पुरस्कार जाहीर

Shahir sambhaji bhagt


By nisha patil - 1/4/2026 3:44:34 PM
Share This News:



**ख्यातनाम शाहीर संभाजी भगत यांना यावर्षीचा लोकशाहीर द.ना.गव्हाणकर पुरस्कार जाहीर*

**पुरस्कार समितीचे जेष्ठ सदस्य मुकुंददादा देसाई यांची घोषणा*

**आजरा(हसन तकीलदार)*:- शाहिरी ही केवळ मनोरंजनासाठी नसून समाज प्रबोधन हेच तिचे मुख्य हेतू असतो हा विचार केंद्रस्थानी ठेऊन ज्यांनी आपली शाहिरी कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासींच्या मुक्तीदायी राजकारणासाठी वापरली तोच वसा आणि वारसा घेऊन समाज प्रबोधन घडवणाऱ्या शाहीर संभाजी भगत यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना, गव्हाणकर पुरस्कार देण्याचा निर्णय आज झालेल्या पुरस्कार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी पुरस्कार समितीचे जेष्ठ सदस्य मुकुंददादा देसाई, जि.प.सदस्य सुधीरभाऊ देसाई, कार्याध्यक्ष कॉम्रेड संपत देसाई, सचिव सुनील पाटील, प्रा.डॉ. नवनाथ शिंदे, युवराज पोवार, प्रा. मीना मंगळूरकर, रावसाहेब देसाई, मनोहर गव्हाणकर,कॉ. संजय घाटगे, कॉ. संजय तर्डेकर,कॉ. प्रकाश मोरुस्कर, दिगंबर लोहार, कॉ.काशिनाथ मोरे, पत्रकार कृष्णा सावंत,पत्रकार रणजीत कालेकर, अमित सामंत, हिंदुराव कांबळे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

         आज पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा करतांना मुकुंददादा देसाई म्हणाले की,संभाजी भगत यांना एक बंडखोर शाहीर म्हणून अख्खा महाराष्ट्र ओळखतो. लोकशाहीर गव्हाणकरांचा वारसा सांगत त्यांची शाहिरी जातीय, वर्गीय आणि लैंगिक शोषणावर घणाघाती प्रहार करते. लोकगीतातील रसरसीत जिवंतपणा हे त्यांच्या शाहिरीचे वैशिष्ट्य आहे. पोवाडे, भारुडे, ओवी, अभंगासह अनेक लोककलांमध्ये क्रांतिकारक आशय घेत त्यांनी जनप्रबोधनासाठी लोककलांचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. त्यांचे कातळाखालचे पाणी (आत्मचरित्र), अडगळ (नाटक), तोड ही चाकोरी (गाण्याचा संग्रह), रणहलगी (लेखसंग्रह), भारुड आणि गिरणीचा वग (मुक्तनाट्य), शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला (नाटक) इत्यादी साहित्य प्रसिध्द आहे. त्यांच्या कोर्ट या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. लोकशाहीर गदर यांची अनेक गाणी त्यांनी मराठीत आणली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत यापूर्वी त्यांना अस्मितादर्श पुरस्कार, प्रबोधनमित्र पुरस्कार, मिफ्ता पुरस्कार, संत तुकाराम पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यांच्या या लोकशाहिरीशी असलेल्या नात्याचा विचार करून आम्ही यावर्षीचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे असे मुकुंददादा यांनी सांगितले.यावर्षी सातारा येथे होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत.

 


ख्यातनाम शाहीर संभाजी भगत यांना यावर्षीचा लोकशाहीर द.ना.गव्हाणकर पुरस्कार जाहीर
Total Views: 106