बातम्या
कोल्हापुरात गावठी पिस्टलसह तरुण अटकेत; शाहुपूरी पोलिसांची कारवाई
By nisha patil - 2/19/2026 10:12:09 PM
Share This News:
कोल्हापुरात गावठी पिस्टलसह तरुण अटकेत; शाहुपूरी पोलिसांची कारवाई
कोल्हापूर, दि. 19 फेब्रुवारी 2026 : शाहुपूरी पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एका तरुणाला गावठी बनावटीच्या पिस्टलसह ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी गुरनं 123/2026 अन्वये भारतीय हत्यार अधिनियम 1959 च्या कलम 3, 5, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून पोलीस कर्मचारी राहुल यशवंत पाटील (पो.को. 1778) यांनी तक्रार दिली आहे.
ही कारवाई दि. 18/02/2026 रोजी सायंकाळी 6.40 वाजण्याच्या सुमारास लोणार वसाहत कडे जाणाऱ्या रोडवरील रामकृष्ण हॉलसमोरील मार्केट यार्ड परिसरात करण्यात आली. गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले.
आरोपीचे नाव राकेश किरण कारंडे (वय 35, व्यवसाय – गाडी खरेदी-विक्री, रा. शास्त्रीनगर, कोल्हापूर) असे असून त्याच्याकडून अंदाजे 50 हजार रुपये किंमतीची एक स्टील बनावटीची, काळ्या रंगाच्या मुठीची गावठी पिस्टल (मॅगझिनसह) तसेच 2 हजार रुपये किंमतीचे KF 7.65 असे नमूद असलेले एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपी हा सदर पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या जवळ बाळगून असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार, तसेच पोलीस उपअधीक्षक श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
शहरात बेकायदेशीर शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून मोहीम तीव्र करण्यात आली असून नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापुरात गावठी पिस्टलसह तरुण अटकेत; शाहुपूरी पोलिसांची कारवाई
|