बातम्या
शाहुपुरी पोलिसांची मोठी कारवाई – चोरीचा ट्रक जप्त, दोघे आरोपी अटकेत
By nisha patil - 9/24/2025 3:24:13 PM
Share This News:
शाहुपुरी पोलिसांची मोठी कारवाई – चोरीचा ट्रक जप्त, दोघे आरोपी अटकेत
कोल्हापूर – शाहुपुरी पोलिसांनी चोरीला गेलेला ट्रक अवघ्या काही दिवसांत शोधून काढत जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.
फिर्यादी पर्वतसिंग इंदरसिंग भाटी (वय 46, मूळ रा. जोधपूर, राजस्थान, सध्या रा. देसाई नगर, साखळी, गोवा) यांच्या मालकीचा टाटा कंपनीचा 2515 मॉडेल (2011 सालचा) ट्रक (आरजे 16 जीए 2337) हा दि. 15/09/2025 रोजी सकाळी 9 ते दि. 16/09/2025 रोजी सकाळी 9 या दरम्यान मार्केट यार्ड लगतच्या वाळू मार्केट परिसरातून चोरीस गेला होता. ट्रकाची किंमत सुमारे 3 लाख रुपये असून त्यासंबंधी गुन्हा रजि. नं. 676/2025 भा.न्या.सं. 2023 चे कलम 303(2) प्रमाणे शाहुपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता.
तपास सुरू असताना पोलीस अंमलदार बाबासाहेब ढाकणे व अमोल पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार संशयित आरोपी सतिश श्रीपती चिखलकर (वय 39, रा. चिखलकरवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, सध्या रा. राजाराम तलावाजवळ, कोल्हापूर) व सयाजी दिनकर चिखलकर (वय 32, रा. चिखलकरवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी ट्रक चोरीची कबुली दिली. आरोपींच्या माहितीनुसार ट्रक राजाराम तलावाजवळ उभा करून ठेवण्यात आलेला आढळून आला. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका :
या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, तसेच पोलीस अंमलदार मिलींद बांगर, बाबा ढाकणे, महेश पाटील, सुशिलकुमार गायकवाड, सनिराज पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, कृष्णात पाटील, मंजर लाटकर यांनी विशेष मेहनत घेतली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अमित पोवार (ब. क्र. 1297) करत आहेत.
👉 शाहुपुरी पोलिसांच्या या तात्काळ कारवाईमुळे चोरीला गेलेला ट्रक परत मिळाला असून स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त केले जात आहे.
शाहुपुरी पोलिसांची मोठी कारवाई – चोरीचा ट्रक जप्त, दोघे आरोपी अटकेत
|