बातम्या
शक्तीपीठ महामार्गच्या संयुक्त मोजणीला बाधित शेतकऱ्यांचा ठाम विरोध
By nisha patil - 8/5/2026 2:49:41 PM
Share This News:
*शक्तीपीठ महामार्गच्या संयुक्त मोजणीला बाधित शेतकऱ्यांचा ठाम विरोध*
*गाव शिवारात पाय ठेवू देणार नाही-बाधित शेतकरी*
*आजरा(हसन तकीलदार)*:- शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित अरेखनाला पाच मे रोजी अंतिम मान्यता देऊन महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जाहीर केली आहे. या आधारे येत्या काही दिवसात संयुक्त मोजणी सुरू करण्याची करणार असल्याची हालचाल प्रशासनाच्या स्तरावर सुरू असल्याची कुणकुण लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज आजरा येथे तालुक्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची बैठक श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यालयात पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई होते. बैठकीचा हेतू स्पष्ट करताना ते म्हणाले की राज्य सरकारने अंतिम अधिसूचना 5 मे रोजी जाहीर केली असून त्याच्या आधारे शेतकऱ्यांना बेसावध ठेवून संयुक्त मोजणी करण्याच्या घाट सरकारने आखला आहे संयुक्त मोजणी करण्याची हालचाल प्रशासनाच्या स्तरावर सुरू असल्याचे समजते. त्यामुळे शक्तीपीठचे हे संकट शेतकऱ्यांच्या गाव शिवारात आले आहे. 15 तारखेपर्यंत संयुक्त मोजणी करून अहवाल शासनाला देण्याचे आदेश महसूल विभागाला आल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर आज ही तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत संयुक्त मोजणी पथकाला गावात किंवा शिवारात फिरू द्यायचे नाही. काही झाले तरी शक्तिपीठ महामार्ग हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी आता तयार राहावे.
यावेळी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले, आपण आता ढिले पडता कामा नये. काही झाले तरी संयुक्त मोजणी करू द्यायची नाही त्यासाठी तीव्र विरोध करूया असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील.संयुक्त मोजणी पथकाला गाव शिवारात फिरकू देणार नाही.
यावेळी युवराज पोवार, युवराज जाधव, नामदेव गुरव, कॉ शांताराम पाटील, काशिनाथ मोरे, चंद्रकांत जाधव,कॉ.संजय घाडगे, शंकर हाळवणकर, दिनेश कांबळे, महादेव गुरव, दिगंबर पाटील, सुभाष देसाई, संजय देसाई, प्रकाश दोरुगडे यांच्यासह कार्यकर्ते मोठया उपस्थित होते.
**सोमवारी शक्तीपीठ बाधित शेतकरी आजरा पंचायत समिती येथे मोठ्या संख्येने एकत्रित येत आजरा तहसीलदार यांना शक्तीपीठच्या संयुक्त मोजणीसह या महामार्गाला तीव्र विरोध असल्याचे निवेदन देणार आहेत असे यावेळी सांगण्यात आले **
शक्तीपीठ महामार्गच्या संयुक्त मोजणीला बाधित शेतकऱ्यांचा ठाम विरोध
|