बातम्या
सर्व शक्तिनीशी विरोध करणार पेरणोली येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय
By nisha patil - 12/1/2026 6:28:20 PM
Share This News:
सर्व शक्तिनीशी विरोध करणार पेरणोली येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय
आजरा(हसन तकीलदार ):-नव्याने अरेखीत केलेल्या शक्तीपीठ महामार्गाला सर्व शक्तीनिशी विरोध करण्याचा निर्णय आज पेरणोली येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. शुक्रवारी याबाबतचे निवेदन तहसीलदार आजरा यांना देण्यात येणार असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम बघून बाधित गावातील शेतकऱ्यांचा मेळावा लवकरच घेण्यात येणार आहे.
सुरवातीला शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ. संपत देसाई यांनी शक्तिपीठ महामार्गाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की,शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून तो केवळ भांडवलदारांचे हितसंबंध जपण्यासाठी बांधण्यात येणार आहे. इथल्या पर्यावरणाची, नद्या-नाल्यांची, जंगलाची, शेतीची नासधूस करून मानवी जीवन उध्वस्त करणारा आहे. हा रस्ता शेतकऱ्यांच्या उपयोगाचा नसून साधा प्रवेशही आपल्याला यावर करता येणार नाही, त्यामुळे आमचा या रस्त्याला तीव्र विरोध असून कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग आम्ही होऊ देणार नाही
पुढे बोलताना शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले की, हा रस्ता केवळ अदानीसाठी बांधला जात आहे आज अदानी देश ताब्यात घ्यायला निघाला आहे. रस्ता हे त्याचे प्रातिनिधिक रूप आहे. गडचिरोलीहून गोव्याला खनिजे सहजपणे नेता यावी केवळ यासाठी हा रस्ता बांधला जात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता होऊ द्यायचा नाही असा निर्धार आपण करूया.
यावेळी बोलताना सुधीर देसाई म्हणाले,आपण सगळे मिळून सर्व शक्तीनिशी या महामार्गाला विरोध करूया कोणत्याही परिस्थितीत आपण हा मार्ग आपण होऊ द्यायचा नाही त्यासाठी पक्ष संघटना बाजूला ठेवून संघटितपणे सामोरे जाऊया
यावेळी युवराज जाधव (खानापूर) म्हणाले की, या विभागाचे लोक प्रतिनिधी आणि पालक मंत्री यांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी.
यावेळी अमर पवार (पेरणोली), आनंदराव कुंभार (कोरीवडे) सुभाष देसाई (पेरणोली), जनार्दन देसाई, पांडुरंग जोशीलकर, सुररेश पाटील (कोरिवडे), डॉ धनाजी राणे (वेळवट्टी),हरिभाऊ कांबळे यांनीही कांही महत्वाच्या सूचना मांडल्या.
यावेळी युवराज पोवार, संकेत सावंत, नामदेव गुरव, डी ए पाटील, उदय कोडक, सर्जेराव देसाई, दिनेश कांबळे, सचिन देसाई, शंकर तिबिले, मारुती पाटील, हिंदुराव कालेकर, शंकर हाळवणकर, विठ्ठल मस्कर, बाळासो कुकडे, भीमराव हाळवणकर, संभाजी पाटील, मयुरेश देसाई, ज्ञानदेव ढोकरे, संदीप पाटील, अशोक सासुलकर यांच्यासह पेरणोली, हरपवडे, कोरिवडे, वेळवट्टी, खानापूर गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व शक्तिनीशी विरोध करणार पेरणोली येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय
|