बातम्या
सोमवारचा शक्तीपीठ विरोधी मोर्चा यशस्वी करणार
By nisha patil - 5/16/2026 2:40:51 PM
Share This News:
**सोमवारचा शक्तीपीठ विरोधी मोर्चा यशस्वी करणार*
**मसोली, पेरणोली, देवर्डे येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्धार....*
आजरा(हसन तकीलदार)*:-शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा सोमवारी होणारा मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करण्याचा निर्धार गावोगावी होत असलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकांमधून करण्यात येत आहे. नुकताच आजरा एमआयडीसी येथे झालेल्या टोल मधून आजरा तालुका वगळण्याचा निर्णय झाला असून या निर्णयामुळे आजरा तालुक्यातील लढणाऱ्या जनतेला बळ मिळाले आहे.
गेली तीन वर्ष आजरा तालुक्यातील जनता टोलविरोधी आंदोलन करीत आहे या आंदोलनामुळे टोल मधून तालुक्यातील घरगुती वापराच्या खाजगी वाहनांना सवलत मिळाली आहे. हा एक प्रकारे लढणाऱ्या जनतेचा विजय आहे. म्हणूनच आजरा तालुक्यातील जनता संघर्षावर विश्वास ठेवून सोमवारच्या मोर्चात मोठ्या संख्येने उतरणार आहे असे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई यांनी सांगितले गेले.
पुढे ते म्हणाले की,आठवड्यापूर्वी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आजरा तहसील कार्यालयावर १८ मे ला सोमवारी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. हा केवळ इशारा न होता प्रत्यक्ष मोर्चात मोठ्या संख्येने उतरून शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे हे तालुक्यातील जनता दाखवून देईल.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले की,राज्यभर या विरोधात मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. आजरा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने लढ्यात उतरून हा तालुका लढणाऱ्यांचा आहे हे दाखवून देईल. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ द्यायचा नाही या निर्धाराने तालुक्यातील शेतकरी आता कामाला लागला आहे.
मसोली येथे झालेल्या बैठकीत ए.के.पावले, सरपंच गुरव यांनी स्वागत आणि प्रस्तावना केली. पेरणोली येथील सभेत सुभाष देसाई, सुरेश कालेकर, विठ्ठल मस्कर, आदेश गुरव, कृष्णा सावंत, सर्जेराव देसाई, अमृत सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर देवर्डे येथील सभेत मुकुंद तानवडे, जोतिबा चाळके, निवृत्ती कांबळे, बळीराम तानवडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवारचा शक्तीपीठ विरोधी मोर्चा यशस्वी करणार
|