बातम्या
शास्त्रीनगर हॉस्पिटल डोंबिवली येथील डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा कडून जाहीर निषेध
By nisha patil - 9/7/2026 4:52:35 PM
Share This News:
**शास्त्रीनगर हॉस्पिटल डोंबिवली येथील डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा कडून जाहीर निषेध*
मेडिकल असोसिएशन आजराने तहसीलदार यांना दिले निवेदन*
*आजरा(हसन तकीलदार)*डोंबिवलीतील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात महिला डॉक्टर आणि सिस्टरवर स्थानिक लोकप्रतिनिधींकडून झालेला हल्ला अत्यंत निंदनीय, धक्कादायक आणि संतापजनक आहे. रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर असा अमानुष हल्ला होणे ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे.हल्ल्यांच्या घटना अत्यंत गंभीर चिंतेचा विषय आहेत.या घटनेचा निषेध व्यक्त करीत दोषींवर कठोर कारवाई व्हावी असे आजरा मेडिकल असोसिएशन तर्फे आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे आणि ठोस संरक्षणात्मक उपाययोजना तातडीने राबविणे अत्यावश्यक आहे.
अन्यथा, यामुळे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होईल आणि आरोग्यसेवा व्यवस्थेवरही गंभीर परिणाम होईल.
त्यामुळे, या प्रकरणाची शासनाने तात्काळ गंभीर दखल घ्यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या मागणीसह पुढे म्हटले आहे की,आम्ही पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो.
या घटनेचा निषेध आणि पीडित अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रती ऐक्य व्यक्त करण्यासाठी, आज दिनांक 9 जुलै 2026 रोजी सर्व डॉक्टर्स व कर्मचारी आपल्या आपल्या कार्यस्थळी काम करताना काळी फीत लावून काम करत आहेत.
तसेच, संबंधित तालुका व विभागांतील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी (एसडीओ), जिल्हाधिकारी, पोलीस आयुक आणि पोलीस उपायुक्त यांना निवेदन सादर करण्यात येईल.
संबंधित लोक प्रतिनिधींवर प्रशासनाने कठोर कारवाई केली नाही, तर महाराष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येतील.या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील. राज्यव्यापी सेवा बंद करणेत येईल.संपूर्ण महाराष्ट्रात बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण सेवा बंद ठेवून 'काम बंद' आंदोलन पुकारले जाईल.यामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल.पीडित वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेना त्वरित न्याय मिळायलाच हवा.
पीडित डॉक्टर व परिचारिकांच्या पाठीशी मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा ठामपणे उभी आहे.असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी मेडिकल असोशियेशन आजरा चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
शास्त्रीनगर हॉस्पिटल डोंबिवली येथील डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा कडून जाहीर निषेध
|