बातम्या
आजरा शहर व तालुक्यात शिमगोत्सव आनंदात साजरा
By Administrator - 3/3/2026 6:52:23 PM
Share This News:
आजरा शहर व तालुक्यात शिमगोत्सव आनंदात साजरा
आजरा(हसन तकीलदार ) :- आजरा शहर व तालुक्यात शिमगा सण दणक्यात व आनंदाने साजरा करण्यात आला. काल सोमवारी रात्री घरगुती व सार्वजनिक होळ्यांचे विधिवत पूजन करून त्या पेटवण्यात आल्या. ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीने पूजन करून पोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. आजरा शहरात अजूनही काही भागात होळीच्या कोळशावर पाणी गरम करून घरगुती वापरात आणण्याची प्रथा आहे. ती पहावयास मिळाली. एकता कॉलनी, रवळनाथ कॉलनी, सोमवार पेठ, नाईक गल्ली, चाफेगल्ली, बाजार पेठ, वाणी गल्ली इ. ठिकाणी सार्वजनिक होळी पूजन करून नैवेद्य दाखवून होळी पेटवण्यात आली.
शिमगोत्सव म्हणजेच शिमगा हा कोकण आणि गोवा भागातील हिंदुबांधवांचा फाल्गुन महिन्यात साजरा होणारा एक प्रमुख, पारंपारिक सण आहे. फाल्गुन शुद्ध पंचमी ते पौर्णिमा आणि त्यानंतरही काही दिवस हा सण साजरा केला जातो. लोकनृत्य, सोंग, ढोलताशांचा गजर, संकासुर नृत्य, लेझीम आणि रंगांची उधळण केली जाते जे वसंत ऋतुच्या आगमनाचे प्रतीक आहे. शिमगोत्सव हा केवळ रंगांचा सण नसून लोकसंस्कृतीचा, परंपरांचा आणि सामुदायिक आनंदाचा भव्य सोहळा आहे. आजऱ्यातही सर्व गल्ल्या, कॉलनीतून सर्वजण एकत्र येत शिमगोत्सव साजरा करण्यात आला. आज विविध करमणूकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. खेड्या पाड्यातील लोकं, मुले विविध सोंग घेऊन खेळ करीत आजरा बाजारपेठेत आल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो. खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती आणि परंपरेची प्रचिती होते.
आजरा शहर व तालुक्यात शिमगोत्सव आनंदात साजरा
|