बातम्या

'शिंदेशाही' मुख्य आकर्षण; डॉ. संजय डी. पाटील यांना शिव-जीवन गौरव पुरस्कार

Shindeshahi main attraction


By Administrator - 3/28/2026 3:14:37 PM
Share This News:



शिवाजी विद्यापीठात उद्या रंगणार शिव महोत्सव
 

'शिंदेशाही' मुख्य आकर्षण; डॉ. संजय डी. पाटील यांना शिव-जीवन गौरव पुरस्कार
 

कोल्हापूर, दि. २७ मार्च : शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी स्नेह मेळावा कृती समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे “शिव महोत्सव २०२६” या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे उद्या, शनिवारी (दि. २८) सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात होणाऱ्या या महोत्सवात परंपरा, संस्कृती आणि आधुनिक कलाविष्कार यांचा संगम अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्याध्यक्ष श्रीमती सरोज पाटील (माई) यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अध्यक्षस्थानी असतील. ही माहिती महोत्सवाचे प्रवर्तक डॉ. प्रविण कोडोलीकर आणि संयोजन समितीचे अध्यक्ष मंजीत माने, उपाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी दिली आहे.
 

यंदा महोत्सवाचे २१ वे वर्ष असून, या वर्षीचा शिव-जीवन गौरव पुरस्कार डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.‌संजय डी. पाटील यांना, तर शिव-सेवा पुरस्कार भरत लाटकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी अनिल लवेकर यांचा पंचाहत्तरीनिमित्त विशेष सत्कार करण्यात येणार आहे. 
 

यंदा शिव महोत्सवात “जल्लोष तरुणाईचा” या संकल्पनेतून युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला आहे. गीत, नृत्य, लोकसंगीत तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणांचा बहारदार कार्यक्रम यामध्ये सादर होणार आहे. "शिंदेशाही" हा कार्यक्रम यंदाचे विशेष आकर्षण असून यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आनंद शिंदे आणि गायक उत्कर्ष शिंदे यांच्या सादरीकरणामुळे  रंगत अधिक वाढणार आहे. सार्थक क्रिएशन्सच्या वतीने “लोककलेचा आविष्कार” या विशेष सत्रात पारंपरिक लोककला सादर केली जाणार असून, उपस्थितांना समृद्ध सांस्कृतिक अनुभव मिळणार आहे. याखेरीज विविध कलाकार आणि विद्यार्थी गट आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत.
 

महोत्सवाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठातील सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा, “शिव पुरस्कार” वितरण आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामागे विद्यापीठाशी निगडित माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणणे आणि त्यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करणे हा उद्देश आहे.
 

या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, पेठवडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ. विद्याताई गुलाबराव पोळ, कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, कोल्हापूर उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रकाश बच्छाव, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक विजय जाधव, आदिल फरास, विरोधी पक्ष नेता राजेश लाटकर,  पेठवडगावच्या डॉ. सायन्स पूनावाला इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. सरदार जाधव, इतिहास संशोधक डॉ, कपिल राजहंस, रोहित कोळेकर, सागर अहिवळे आदी उपस्थित राहणार आहेत.
 

या भव्य सांस्कृतिक सोहळ्यासाठी प्रवेशिका मोफत असून येताना सोबत आणणे आवश्यक आहे. इच्छुकांनी त्यासाठी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


'शिंदेशाही' मुख्य आकर्षण; डॉ. संजय डी. पाटील यांना शिव-जीवन गौरव पुरस्कार
Total Views: 10