ताज्या बातम्या

शिरढोण ग्रा.प. आर्थिक गैरव्यवहार चौकशी पूर्ण कारवाईकडे लक्ष

Shirdhon Gram Panchayat Financial Misconduct Investigation Focused on Complete Action


By nisha patil - 2/14/2026 1:00:13 PM
Share This News:



शिरढोण ग्रा.प. आर्थिक गैरव्यवहार चौकशी पूर्ण कारवाईकडे लक्ष 


शिरढोण प्रतिनिधी(संजय गायकवाड) /ता.१४
  शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत दप्तरांची तपासणी विशेष पथकाने पूर्ण केली असून कारभारात अनेक गंभीर चुका झाल्याचे पथकाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सदस्यांचे धाबे दणाणले आहे. पथकाने तपासणी अहवाल गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्याकडे सुपूर्द केले असून कोणती कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.


   येथील ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली केवळ कागदोपत्री पुर्तता करून मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी सरपंचासह सदस्यांवर केला होता. या विषयांवरुन मासिक सभेसह, गावसभा वादळी होत होती. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा. चंद्रकांत मोरे, सुरेश सासणे, माजी पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील, माजी उपसरपंच पोपट पुजारी, विश्वास बालीघाटे आदींनी पुढाकार घेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तीकेयन यांच्याकडे लेखी तक्रार करून ग्रामपंचायत दप्तरांची तपासणी करावी अशी मागणी केली होती. 


   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी तात्काळ शिरोळ गटविकास अधिकारी परीट यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे गटविकास अधिकारी परीट यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयात पथकाने सर्वच विभागाच्या दप्तरांची तपासणी तसेच स्थळ पाहणी करून अहवाल गटविकास अधिकारी परीट यांना सोमवारी दिले आहे. यामध्ये सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्या गंभीर चुका झाल्याचे पथकाच्या निदर्शनास आल्याने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसह पदाधिकारी व सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामुळे अहवालावरून दोषींवर कोणती कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.


शिरढोण ग्रा.प. आर्थिक गैरव्यवहार चौकशी पूर्ण कारवाईकडे लक्ष
Total Views: 76