ताज्या बातम्या
शिरढोण ग्रा.पं. गैरव्यवहार चौकशी सुरू, ग्रामसेवक शेवरे धारेवर
By nisha patil - 1/14/2026 11:22:30 AM
Share This News:
शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारींची चौकशी मंगळवारी सुरू झाली. सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाणे यांच्या अध्यक्षतेखाली सात अधिकाऱ्यांचे पथक दिवसभर कागदपत्रांची तपासणी करत होते.
चौकशीदरम्यान तत्कालीन ग्रामसेवक विनायक शेवरे अपूर्ण प्रोसिडिंग पूर्ण करत असताना तक्रारदार अविनाश पाटील, विश्वास बालीघाटे, सुरेश सासणे, अशोक मगदूम यांनी आक्षेप घेत जाब विचारला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. हा प्रकार समितीच्या निदर्शनास आणताच प्रोसिडिंग काढून घेऊन संबंधितांना कार्यालयाबाहेर काढण्यात आले.
गेल्या चार वर्षांत ग्रामपंचायत कारभारात विविध विभागांत बोगस खर्च दाखवून गैरव्यवहार झाल्याची तक्रार अविनाश पाटील, सुरेश सासणे, विश्वास बालीघाटे, पोपट पुजारी, अशोक मगदूम यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे केली होती. त्यानंतर गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी चौकशी समिती नेमली.
समितीने बांधकाम, शिक्षण, आरोग्य व महिला-बालविकास विभागातील खर्चाची कागदपत्रे व स्थळपाहणीद्वारे तपासणी केली. अनेक बाबी संशयास्पद आढळून आल्या असून अहवाल लवकरच गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. तारां न्यूज साठी शिरढोण प्रतिनिधी संजय गायकवाड
शिरढोण ग्रा.पं. गैरव्यवहार चौकशी सुरू, ग्रामसेवक शेवरे धारेवर
|