बातम्या

लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित 

Shirdhon5


By nisha patil - 10/1/2026 10:40:57 PM
Share This News:



लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित 

चौकशी समिती ७ दिवसात गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार

शिरढोण प्रतिनिधी(संजय गायकवाड)/ता.१० शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाणे यांच्या अध्यक्षतेखाली ७ जणांची समिती गठीत करण्यात आली असून समिती सदस्य प्रत्येक विभागाची सखोल चौकशी करुन ७ दिवसांत अहवाल देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर विस्तार अधिकारी रविंद्र कांबळे यांच्या हस्ते सरबत घेवून ग्रामपंचायत चौकातील उपोषण मागे घेण्यात आले.

 येथील ग्रामपंचायतीमध्ये १५व्या वित्त आयोगातील निधी, व घरफाळा, पाणीपट्टी वसुली व खर्चात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशा मागणीचे निवेदन अविनाश पाटील , पोपट पुजारी,जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य प्रा. चंद्रकांत मोरे, सुरेश सासणे, विश्वास बालीघाटे. बाबूराव मुंगळे, विजय सुर्यवंशी आदींनी गेल्या महिन्यात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तीकेयन यांच्याकडे केली होती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी या गैरव्यवहार प्रकरणाची तात्काळ चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांना दिले होते.             

  त्यामुळे गत आठवड्यात दोन दिवस चौकशी समिती येवून पुन्हा गायब झाल्याने तसेच तक्रारदार यांना अहवाल मिळाला नसल्याने शनिवारी ग्रामस्थांनी उपोषणाला बसले होते. आंदोलनामुळे शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाणे यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय समिती गठीत केली आहे.

सर्व सदस्य विस्तार अधिकारी पदावरील असून अनिल घोडेस्वार विस्ताराधिकारी (महिला बालकल्याण), पांडुरंग महाडिक विस्ताराधिकारी (आरोग्य विभाग), विनायक कोळी शाखा अभियंता(बांधकाम), सूर्यकांत कोडोले शाखा अभियंता (पाणीपुरवठा), भारती कोळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी (शिक्षण), रवींद्र कांबळे विस्ताराधिकारी (ग्रामपंचायत) या वेगवेगळ्या विभागाचे आहेत. प्रत्येक गठीत सदस्यांना स्वतंत्र विभागाची चौकशीचे आदेश दिले आहेत. सोमवार(दि.१२)पासून ही समिती दप्तरांची तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. तशा आशयाचे लेखी पत्र विस्तार अधिकारी रविंद्र कांबळे व बाळासो कदम यांनी आंदोलनस्थळी येवून आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

   उपोषणाला अविनाश पाटील, सुरेश सासणे, विश्वास बालीघाटे, पोपट पुजारी. बाबूराव मुंगळे,अशोक मगदूम आदी बसले होते. सरपंच सागर भंडारे सोडले तर उपोषण स्थळाकडे ग्रामपंचायतीचे इतर सदस्य यांनी पाठ फिरवली.यावेळी माजी सरपंच बाबुराव कोईक, सूर्यकांत कोळी,सूहेल बानदार, विजय सूर्यवंशी, पप्पू कुग्गे, मनोहर मुजगोंडा,सुरेश हनबर,महादेव सूर्यवंशी, महादेव शिंगे आदींनी भेट दिली.


लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित 
Total Views: 27