ताज्या बातम्या
दिवाळी दारात, पण शिवभोजन केंद्रचालक उपाशी – पाच महिन्यांपासून निधी गायब!
By nisha patil - 9/10/2025 11:29:41 AM
Share This News:
कोल्हापूर :- गरिबांचे पोट भरणारी शिवभोजन थाळी योजना आता स्वतःच्याच केंद्रचालकांना उपाशी ठेवत आहे. मागील पाच महिन्यांपासून शासनाकडून अनुदान न मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक केंद्रचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. दिवाळीचा सण दारात असतानाच त्यांचं दिवाळं निघालं आहे.
जिल्ह्यात एकूण ५३ शिवभोजन थाळी केंद्रे असून, केंद्रचालकांना थाळीमागे शहर भागात ४० रुपये आणि ग्रामीण भागात ३५ रुपये अनुदान दिले जाते. या प्रमाणे जिल्ह्यासाठी दर महिन्याला सुमारे ६० लाख रुपयांचे अनुदान लागते. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून या योजनेचे अनुदान मिळालेले नाही. परिणामी, तब्बल ३ कोटी रुपयांची थकबाकी शासनाकडे प्रलंबित आहे.
गरीब, निराधार आणि रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना स्वस्तात अन्न मिळावे, कोणीही उपाशी राहू नये या हेतूने शासनाने शिवभोजन योजना सुरू केली होती. गेल्या काही वर्षांपासून केंद्रे सुरळीत चालू होती. मात्र मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर निधीअभावी या योजनेलाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राज्यभरातील १८०० पेक्षा अधिक शिवभोजन केंद्रचालकांनी थकीत अनुदानासाठी विविध ठिकाणी आंदोलन, उपोषण केलं. त्यानंतर शासनाने २०० कोटी रुपयांची थकबाकी मंजूर करण्याचा निर्णय घेतला, मात्र प्रत्यक्षात केवळ २१ कोटी रुपयांवरच बोळवण करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील केंद्रचालकांचे एप्रिल महिन्यापासूनचे अनुदान थकीत होते. काही दिवसांपूर्वी फक्त एप्रिल महिन्याचे पैसे देण्यात आले असून, उर्वरित पाच महिन्यांचे अनुदान अद्याप प्रलंबित आहे.
🗣️ शिवभोजन केंद्रचालक म्हणाले:
“गेल्या पाच महिन्यांपासून थाळीचे अनुदान मिळालेले नाही. दिवाळीचा सण तोंडावर आहे. किराणा दुकानदारांकडे उधारी करून तरी किती करायची? पुन्हा साहित्य न्यायला त्यांच्या दारात जायचे म्हणजे नको वाटते. शासनाने ही अडचण ओळखून लवकरात लवकर अनुदान द्यावे.”
दिवाळी दारात, पण शिवभोजन केंद्रचालक उपाशी – पाच महिन्यांपासून निधी गायब!
|