बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रयत्नशील

Shiv Sena Medical Help Cell


By nisha patil - 11/28/2025 4:15:24 PM
Share This News:



प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रयत्नशील

कोल्हापूर: शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली व कोल्हापूर जिल्हाप्रमुख विनायक जरांडे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहरातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, वॉर्ड दवाखाना यांना भेटी देऊन नागरिकांचे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन यामध्ये सुधारणा करण्याबाबत महानगरपालिकेचे उपायुक्त किरण धनवडे यांना निवेदन देण्यात आले. 

या आरोग्य केंद्रांच्या भेटीमध्ये प्रामुख्याने हिरकणी कक्षाचा अभाव, जुन्या व जीर्ण झालेल्या इमारती, अपुरा स्टाफ, स्वच्छतागृहांची दुर्दशा आणि अभाव, पार्किंगचा प्रश्न, कंपाउंड चा अभाव, स्थानिक नागरिकांचा त्रास, बंद पडलेली रक्तपेढी, इलेक्ट्रिसिटी बॅकअप चा अभाव, पावसामुळे भिंतींना ओलावा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न अशा अनेक समस्या समोर आल्या. नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र साने गुरुजी वसाहत-मैत्रांगणा येथे कोविड काळात कोविड सेंटरची स्थापना केली होती. त्यावेळी पासून अतिशय महत्त्वाचे किमती ऑक्सिजन सिलेंडर पासून बेडपर्यंत असे खूप सारे साहित्य तिथेच धुळ खात पडून आहे तर त्याच साहित्याची इतर आरोग्य केंद्रात उणीव आहे.
 

या सर्व समस्यांबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन उपायुक्त किरण धनवडे यांनी दिले. 
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख विनायक जरांडे, उपजिल्हाप्रमुख मनमोहन खोत, शहर प्रमुख विनायक जाधव, गगनबावडा तालुका प्रमुख ओंकार पाटील, उपशहर प्रमुख अनिल सावंत, उपतालुकाप्रमुख अक्षय साखरे उपस्थित होते.


प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रयत्नशील
Total Views: 108