राजकीय

शिवसेना उबाठाचे गवसे आरोग्य केंद्राला जाब.. प्रश्नांचा भडीमार करीत उणीवावर बोट

Shiv Sena responds to Ubatha Gavse Health Center


By nisha patil - 6/12/2025 1:02:58 PM
Share This News:



आजरा(हसन तकीलदार):- गवसे ता. आजरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी इमारत बांधण्यात आली आहे. एका वर्षांपूर्वी अगदी थाटात इमारतीचे उदघाट्नही झाले होते. परंतु अजूनही या ठिकाणी पुरेसे डॉक्टर्स तसेच कर्मचारी उपलब्ध नसल्याने या भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळत नसलेने गवसे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याबाबत दि. 03/12/2025 रोजी शिवसेना उबाठाने निवेदन दिले होते. त्यानुसार आज शुक्रवार दि. 05/12/2025 रोजी दु. 12:00वाजता संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. यावेळी शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख यांनी प्रश्नांचा भडीमार करीत जाब विचारला. त्यावेळी आरोग्य अधिकारी यांनीही याबाबत आपले प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट केले.
     शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना विविध प्रश्न करीत जाब विचारला. नवीन इमारत बांधकाम करून एक वर्ष झाले तरी अद्याप या ठिकाणी डॉक्टर्स आणि आवश्यक कर्मचारी उपलब्ध का नाहीत? असे शिवसैनिकांनी विचारले असता तालुका आरोग्य अधिकारी यांनी आजअखेर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद, कोल्हापूर यांचेशी वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे निदर्शनास आणून दाखवत पत्रांच्या प्रतिही दाखवल्या.

त्याचप्रमाणे गवसे प्राथमिक आरोग्य केंद्रात संपूर्ण  कर्मचारी स्टाफ व डॉक्टर्स भरल्यानंतरच कार्यक्षेत्र वाटप करण्यात येईल सद्या येथील कामकाज प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी मार्फत सुरु असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. याठिकाणी प्रसूतीसाठी लागणारे साहित्य तसेच मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचेही सांगण्यात आले. सर्पदंशासाठी लस उपलब्ध असल्याचे सांगितले. गवसे आरोग्य केंद्रात सद्या फक्त बाह्यरुग्ण विभाग सुरु आहे इतर आरोग्याच्या कोणत्याही सेवा रुग्णांना मिळत नसल्याचे शिवसेना उबाठाच्या शिवसैनिकांनी निदर्शनास आणून दिले. यावर आरोग्यविभागातील वरीष्ठाशी संपर्क साधून पाठपुरावा करू असे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
    यावेळी डॉ.आर.जी.गुरव(तालुका आरोग्य अधिकारी), व्ही.ए. काटकर(विस्तार अधिकारी, आरोग्य), श्रीमती एम.बी. भांडकोळी (बी.एन.ओ.), डॉ. मोरे (वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र गवसे), त्याचप्रमाणे युवराज पोवार(आजरा तालुका अध्यक्ष), संभाजी पाटील(उपजिल्हा प्रमुख), डॉ. धनाजी राणे(सामाजिक कर्यकर्ते), दिनेश कांबळे(शेतकरीसेना तालुका अध्यक्ष), शिवाजी आढाव, अमित गुरव, महेश पाटील, चंद्रकांत व्हराकटे, रवी सावंत, रविंद्र यादव, बिलाल लतीफ, राजू बंडगर तसेच गवसे पंचक्रोशीतील उबाठाचे शिवसैनिक उपस्थित होते.


शिवसेना उबाठाचे गवसे आरोग्य केंद्राला जाब.. प्रश्नांचा भडीमार करीत उणीवावर बोट *
Total Views: 94