विशेष बातम्या

कोल्हापूरला ‘खड्डेपूर’ बनवणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाचा शिवसेनेतर्फे आगळावेगळा निषेध

Shiv Sena strongly condemns the Municipal Corporation administration


By nisha patil - 10/20/2025 12:39:12 PM
Share This News:



कोल्हापूरला ‘खड्डेपूर’ बनवणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाचा शिवसेनेतर्फे आगळावेगळा निषेध
 

खड्ड्यांमध्ये रांगोळी आणि पणत्या लावून अनोखे आंदोलन; नागरिकांसह दिवाळीचे स्वागत

कोल्हापूर, दि. १९ : कोल्हापूर शहरातील प्रत्येक रस्ता खड्ड्यांनी भरलेला असून, नागरिकांचा संयम संपत चालला आहे. दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा नागरिकांना नीट रस्ते आणि मूलभूत सुविधा मिळत नाहीत, याविरोधात शिवसेनेतर्फे आज अनोख्या पद्धतीने महापालिकेच्या प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.

जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून आणि पणत्या लावून ‘खड्डेपूर’ कोल्हापूरची दिवाळी साजरी करण्यात आली.
या आंदोलनाद्वारे शहराच्या दुरवस्थेबद्दल निषेध नोंदवत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

इंगवले म्हणाले, “आज कोल्हापूरमध्ये असा एकही रस्ता उरलेला नाही ज्यावर खड्डा नाही. शहरातील जनतेने खड्ड्यांत दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. शासन निधी, शंभर कोटींचे रस्ते आणि विकासाच्या नावाखाली दाखवलेली स्वप्ने ही केवळ कागदावरच राहिली आहेत. महापालिकेचे सुस्त आणि भ्रष्ट प्रशासन तसेच टक्केवारीवर चालणारे लोकप्रतिनिधी हे कोल्हापूरच्या या दुर्दशेस जबाबदार आहेत.”

ते पुढे म्हणाले,
“आम्ही लोकशाही मार्गाने वारंवार आंदोलन केले. पण प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे आता नागरिकांसोबतच शांततेने हा आगळावेगळा निषेध करून त्यांचे डोळे उघडण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा यापुढील तीव्र आंदोलनांसाठी तेच जबाबदार असतील.”

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून, पणत्या लावून आणि ‘खड्डेपूर महापालिका’ अशा फलकांसह निषेध नोंदवला.
या वेळी अनेक शिवसैनिक, नागरिक आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोल्हापूरला ‘खड्डेपूर’ बनवणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाचा शिवसेनेतर्फे आगळावेगळा निषेध
Total Views: 48