राजकीय

शिवसेना उबाठा बैलगाडीसह करणार रस्ता रोको

Shiv Sena will block the road with a bullock cart


By nisha patil - 5/26/2026 4:40:40 PM
Share This News:



शिवसेना उबाठा बैलगाडीसह करणार रस्ता रोको


आजरा(हसन तकीलदार) - सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वसामान्य गरीब जनता महागाईच्या झळीत होरपळत असताना भारत सरकारने पुन्हा डिझेल, पेट्रोलचे दर वाढवल्यामुळे जनतेचे पुरतेच हाल झाले आहेत. सरकारला जागे करण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उबाठा तर्फे बैलगाडीसह रस्ता रोको करण्याचा इशारा देत आजरा तहसीलदारांना निवेदन दिले आहे.


भारतातील जनता महागाईच्या झळा सोसत आहे. गॅस, जीवनावश्यक वस्तू आणि इतर अनुषंगिक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. तरीसुद्धा सरकारच्या नाकर्तेपणामुळे दोन दिवसात 3/-₹ने पेट्रोल वाढ, त्याचप्रमाणे घरगुती गॅस, डिझेल, सी एन जी गॅस दर वाढ करून सामान्य जनतेच्या रोजच्या बजेटचे कंबरडे मोडले आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांना आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणे मुश्किल झाले आहे. दोनवेळची भाकरी मिळणे कठीण झाले आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान जनतेला काटकसरीचा संदेश देतात आणि स्वतः व  त्यांचे सहकारी मंत्री पन्नास साठ गाड्यांचा ताफा घेऊन परदेश आणि राज्याचे दौरे करतात. हा विरोधाभास का? सर्वसामान्य जनतेला पेट्रोल, डिझेल कमी वापरण्याचे सल्ले देत आहेत आणि आपण मात्र परदेश दौऱ्यात मग्न आहेत याच्या निषेधार्थ शुक्रवार दि. 29/05/2026 रोजी दुपारी 11:00 वा. छत्रपती संभाजी चौकात शिवसेना उबाठाच्या वतीने बैलगाडीसह रस्ता रोको करणार असल्याचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.


यावेळी संभाजी पाटील, युवराज पोवार, समिरभाई चांद, सागर नाईक, दिनेशभाऊ कांबळे, विलास किल्लेदार, सुनील डोंगरे, संजय येसादे, बिलालभाई लतीफ, अमित गुरव, महेश पाटील, सुयश पाटील हरिश्चंद्र व्हराकटे, संजयभाई सावंत (उपसरपंच देऊळवाडी ), रोहन गिरी आदिजण उपस्थित होते.


शिवसेना उबाठा बैलगाडीसह करणार रस्ता रोको
Total Views: 107