खेळ
आजरा क्रीडा संकुल खेळाडूंसाठी खुला करण्यासाठी व कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शिवसेना उबाठा करणार निदर्शने.
By nisha patil - 4/11/2025 11:26:43 AM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- शहरात गेली पाच वर्षे आजरा गांधीनगर येथे क्रीडा संकुलाचे काम सुरु आहे. येथील क्रीडा संकुल खेळाडूंसाठी अद्याप खुले केले गेलेले नाही. त्यामुळे सदर क्रीडा संकुल खेळाडूंसाठी खुले करावे व पाच कोटी रुपये खर्चून काम सुरु असणाऱ्या मैदानातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी करीत निदर्शने करण्याचा इशारा देत याबाबतचे निवेदन आजरा पोलीस ठाणे येथे शिवसेना उबाठाने दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आजरा शहरात गेली 5 वर्षे आजरा गांधीनगर येथे क्रीडा संकुलाचे काम सुरु आहे. यामध्ये क्रीडा संकुलाची इमारत पूर्ण होऊन 2 वर्षे झाली तरी ही इमारत क्रीडा विभागाने खेळाडूंसाठी खुली केलेली नाही. आजरा तालुक्यातील खेळाडू वेगवेगळ्या खेळात जिल्हा तसेच राज्य पातळीवर विविध क्रीडा क्षेत्रात यश संपादन करीत आहेत आणि आजरा तालुक्याचे नावलौकिक करीत आहेत तर दुसरीकडे क्रीडा संकुलाची ही इमारत धूळ खात पडलेली आहे.
या अगोदर निवेदन देऊनसुद्धा क्रीडा अधिकारी कोल्हापूर यांनी कोणत्याही कर्मचाऱ्याची नेमणूक याठिकाणी केलेली नाही.त्याचबरोबर मैदानाच्या कामासाठी 5 कोटी रुपये खर्चूनसुद्धा अद्यापही मैदान आणि धावपट्टी पूर्ण झालेले नाही. उलट कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे. या सर्व प्रकरणाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी करीत यासाठी क्रीडा संकुल गांधीनगर येथे शुक्रवार दि. 10/11/2025 रोजी निदर्शने करणार असल्याबाबतही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर युवराज पोवार (तालुकाध्यक्ष), महेश पाटील, सुयश पाटील, अमित गुरव, रोहन गिरी, बिलाल लतीफ, महादेव पोवार आदींच्या सह्या आहेत.
आजरा क्रीडा संकुल खेळाडूंसाठी खुला करण्यासाठी व कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शिवसेना उबाठा करणार निदर्शने.
|